जग युद्धात गुंतलेलं पाहून चीननं बनवली सीक्रेट पाणबुडी, सॅटेलाइट फोटो पाहून लष्करी तज्ज्ञ काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 16:56 IST2022-05-11T16:53:02+5:302022-05-11T16:56:40+5:30
रशिया-युक्रेन युद्धात जग अडकलेलं पाहून चीननं गुप्तपणे आपली लष्करी ताकद (Chinese Military Power 2022) वाढवली आहे.

जग युद्धात गुंतलेलं पाहून चीननं बनवली सीक्रेट पाणबुडी, सॅटेलाइट फोटो पाहून लष्करी तज्ज्ञ काय म्हणाले?
बीजिंग-
रशिया-युक्रेन युद्धात जग अडकलेलं पाहून चीननं गुप्तपणे आपली लष्करी ताकद (Chinese Military Power 2022) वाढवली आहे. उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रांमध्ये एक पाणबुडी (China New Submarine) आढळून आली आहे, जी आतापर्यंत जगाच्या नजरेपासून लपलेली होती. सॅटेलाइट इमेजमध्ये (Chinese Submarine Satellite Images) ही पाणबुडी चिनी शिपयार्डच्या ड्राय डॉकमध्ये उभी असलेली दिसते. अणुऊर्जेवर चालणारी ही पाणबुडी (Chinese Nuclear Submarine) यापूर्वी पाहिली नसल्याचे लष्करी विश्लेषकांचं म्हणणं आहे. नव्या क्लासची ही पहिली पाणबुडी असू शकते किंवा जुन्या पाणबुडीला अपग्रेड करून नवीन आकार दिला गेला आहे. यूएस ऑफिस ऑफ नेव्हल इंटेलिजेंसनुसार, २९१५ पर्यंत चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही पाणबुडी फोर्सकडे ५७ डिझेल इलेक्ट्रिक पाणबुड्या आणि ५ अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या होत्या.
नवीन मॉडेल किंवा अपग्रेड व्हर्जन?
लष्करी विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार संबंधित पाणबुडी नवं मॉडेल आहे की जुन्या पाणबुडीची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे हे स्पष्ट झालेलं नाही. चीन आपल्या पाणबुडीची ताकद वेगानं वाढवत असल्याचं विश्लेषकांचं मत आहे. त्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या पेंटागॉनच्या अहवालाचा संदर्भ दिला, ज्यात असं सुचवलं होतं की चिनी नौदल काही वर्षांपासून क्रूझ क्षेपणास्त्रांवर हल्ला करण्यासाठी नव्या पाणबुडी तयार करण्याचं काम करत आहे. अशा परिस्थितीत सॅटेलाइट इमेजमध्ये दिसणारी पाणबुडीही तशीच असू शकते, असा विश्वास अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात नमूद करण्यात आला होता.
मिसाइल लॉन्च ट्यूब आणि प्रपल्शन सिस्टमवर कव्हर
खाजगी सॅटलाइट इमेजनरी कंपनी असलेल्या प्लॅनेट लॅब्स आणि सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये, चीनी पाणबुडी लिओनिंग प्रांतातील हुलुदाओ बंदरात कोरड्या गोदीत उभी असलेली दिसून येत आहे. बाहेर उभ्या असलेल्या या पाणबुडीचा बहुतांश भागही हिरव्या कापडानं झाकण्यात आला आहे. यामध्ये पाणबुडीच्या क्षेपणास्त्राची व्हर्टिकल लॉन्च ट्यूब आणि पाणबुडीच्या मागील बाजूस राहणाऱ्या अॅडव्हान्स प्रपल्शन सिस्टमचा समावेश आहे. चीन आपल्या नवीन पाणबुड्या खूप लपवून ठेवतो. चीनची नवी पाणबुडी अगदी खुल्या पद्धतीन दिसून येण्याी ही पहिलीच वेळ आहे.
टाइप ०९३ सारखी दिसते नवी पाणबुडी
२४ एप्रिल ते ४ मे दरम्यान पाणबुडीला कोरड्या डॉकसाठी पाण्यातून बाहेर आणण्यात आले. यानंतर काढलेल्या छायाचित्रांमध्ये त्याच ठिकाणी पाणबुडी पाण्यात बुडालेली दिसत आहे. सिंगापूरचे संरक्षण तज्ज्ञ आणि एस. राजरत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे प्रोफेसर कॉलिन कोह म्हणाले की, मार्गदर्शित क्षेपणास्त्रांसाठी व्हर्टिकल लॉन्च ट्यूबसह चीनी टाइप 093 "हंटर-किलर" पाणबुडीचा हा नवीन प्रकार असू शकतो. मात्र, या पाणबुडीचा क्लास अचूकपणे ओळखण्यासाठी सध्याच्या सॅटेलाईट इमेजेस अपुरी आहेत, असेही ते म्हणाले.
चीनची शस्त्रास्त्रांची भूक उघड
मॉन्टेरी येथील मिडलबरी इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधील शस्त्र नियंत्रणाचे प्राध्यापक जेफ्री लुईस म्हणाले की, ताज्या छायाचित्रांनी चीनचा पर्दाफाश केला आहे. मात्र, ही पाणबुडी नवीन श्रेणीची आहे की जुनी पाणबुडी अपग्रेड करण्यात आली आहे, हे अद्याप थेट सांगता येणार नाही. अमेरिकेच्या गुप्तचर अहवालानंतर चिनी पाणबुडीबद्दल सर्वांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे, असे ते म्हणाले.