मॉस्को : मॉस्कोतील शेरेमेटयेवो विमानतळावर झालेल्या विमान अपघातात एका एअरहॉस्टेसने 31 जणांचा जीव वाचविला आहे. आग लागल्यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. तेव्हा विमानातील हालत खूप खराब होती. विमानाच्या मागील भागात आग लागल्याने धुराचे लोट आतमध्ये पसरले होते. यामुळे प्रवासीही प्रचंड घाबरलेले होते. जसे विमान थांबले तसे एअरहॉस्टेस तात्याना कसाटकिना हिने प्रसंगावधान राखत एक-दोन नाही तर तब्बल 31 प्रवाशांना तिने कॉलर पकडून अक्षरश: विमानातून ढकलले. यामुळे त्यांचा प्राण वाचू शकला. या अपघातात 41 जणांचा मृत्यू झाला.
34 वर्षांच्या तात्याना हिने सांगितले की, विमान थांबताच लाथा मारुन दरवाजा उघडला. यावेळी बरेच प्रवासी त्यांच्या बॅग घेण्याच्या प्रयत्नात होते. यामुळे आपत्कालीन दरवाजातून जाण्यासाठी वेळ लागत होता. त्यांना वाचविण्यासाठी त्यांची कॉलर पकडून ओढत दरवाजापर्यंत आणले आणि धक्का देऊन बाहेर ढकलावे लागले. आम्हाला लवकरात लवकर विमान रिकामे करायचे होते. कारण मागचा हिस्सा जळून खाक झाला होता आणि आग पुढील भागाकडे वेगात सरकत होती. यामुळे दुसरा पर्याय नव्हता.
विमान उड्डाणावेळीच आग लागलीहे रशियन एअरलाईन एरोफ्लोटचे विमान होते. रविवारी उड्डाण घेत असतानाच आग लागली होती. पायलटच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्याने तातडीने विमान खाली उतरवले. मागील बाजुला इंधन असल्याने आग भडकली. यामध्ये दोन मुलांसह 41 जण ठार झाले, तर 9 जण जखमी झाले. आग वीज पडल्याने लागल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी पाऊस सुरु होता.