S Jaishankar On Pakistani Leadership: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर उघडा पडला आहे. दहशतवाद्यांनी 26 निष्पाप हिंदू पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन ठार मारले होते. या प्रकरणावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे नेतृत्व आणि विशेषतः त्यांचे लष्करप्रमुख असीम मुनीर याचे वर्णन अतिशय कट्टरपंथी असे केले.
एका डच वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर म्हणतात, पहलगाममधील हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला आणि हिंदू धर्मातील नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. 26 जणांचा अतिशय निर्दयीपणे त्यांच्या कुटुंबांसमोर मारण्यात आले. धार्मिक मतभेद निर्माण करण्यासाठी हे जाणूनबुजून करण्यात आले. हे समजून घेण्यासाठी तुम्हाला पाकिस्तानी बाजूकडे पहावे लागेल. त्यांचे नेतृत्व, विशेषतः त्यांचे लष्करप्रमुख खूप धार्मिक कट्टर आहेत, अशी टीका परराष्ट्रमंत्र्यांनी केली.
अमेरिकेने मध्यस्थी केली?यावेळी जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीच्या दाव्यांनाही फेटाळले. ते म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानने थेट चर्चेद्वारे युद्धविरामावर सहमती दर्शविली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताशी अनेक देशांनी संपर्क साधल्याचे जयशंकर यांनी सांगितले. पण, भारताने अमेरिकेसह प्रत्येक देशाला हेच सांगितले की, जर पाकिस्तानला युद्धविराम हवा असेल, तर त्याला थेट भारताशी बोलावे लागेल, असेही जयशंकर यांनी यावेळी स्पष्ट केले.