'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 08:30 IST2025-09-12T08:25:48+5:302025-09-12T08:30:39+5:30
रशियाने पोलंडवर केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी याला चूक म्हटले आहे. या परिस्थितीवर खूश नाही आणि लवकरच सर्व काही ठीक होईल अशी आशा आहे, असे ट्रम्प म्हणाले.

'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
मध्य युरोपीय देश पोलंडनं रशियाचे अनेक ड्रोन्स त्यांच्या हवाई क्षेत्रात पाडल्याचा दावा केला आहे. बुधवारी सकाळी पोलंडने NATO देशांसोबत मिळून त्यांची F16 लढाऊ विमाने उतरवली आणि राजधानी वारसा येथील मुख्य हवाई विमानतळासोबतच एकूण ४ एअरपोर्ट बंद केले आहेत. यावरुन आता जगभरात चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर नाराजी व्यक्त केली.
ट्रम्प यांनी याला चूक म्हटले आहे आणि एकूण परिस्थितीवर ते समाधानी नाहीत असे म्हटले आहे. लवकरच सर्वजण संपर्कात येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पोलंडने रशियाचे ड्रोन पाडल्याच्या दावा रशियाने फेटाळला. रशियाने ते युक्रेनियन ड्रोन असल्याचे म्हटले.
'ही चूक असू शकते'
व्हाईट हाऊसमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'ही चूक असू शकते. या संपूर्ण परिस्थिती संबंधित कोणत्याही गोष्टीवर मी समाधानी नाही. आशा आहे की ते संपेल.'
ड्रोनने पोलंडच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पोलिश हवाई क्षेत्रात तीन राफेल जेट विमाने तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. 'मी या विषयावर नाटो सरचिटणीस आणि ब्रिटिश पंतप्रधानांशी बोललो आहे. युरोपियन खंडाची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही रशियाच्या वाढत्या धोक्यांपुढे झुकणार नाही', असे मॅक्रॉन म्हणाले.
पोलंडनेही या परिस्थितीचे वर्णन दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात धोकादायक परिस्थिती म्हणून केले आहे. पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी 'पोलंड युद्धाच्या स्थितीत नाही, परंतु दुसऱ्या महायुद्धानंतरची परिस्थिती कधीही नव्हती त्यापेक्षा जास्त धोकादायक', असा इशारा दिला.