रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन बॉम्बहल्ला केला आहे. युद्ध सुरू झाल्यापासूनचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला असल्याचे युक्रेनियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या हल्ल्यानंतर युक्रेनियन शहरांमध्ये अक्षरशः विध्वंस झाला आहे. कीव प्रदेशात झालेल्या या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून, अनेक लोक जखमी झाले आहे. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. या हल्ल्यात रशियाने एकाचवेळी तब्बल २७३ ड्रोन डागले. हा हल्ला २०२२ पासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ड्रोन हल्ल्यांपैकी एक असल्याचे मानले जात आहे.
रशियाने एकूण २७३ स्फोटक ड्रोन सोडले. यापैकी ८८ ड्रोन पाडण्यात आले. तर इलेक्ट्रॉनिक जामिंगमुळे १२८ ड्रोन निष्क्रिय झाले. एकूण, युक्रेनने ६०% पेक्षा जास्त हल्लेखोर ड्रोन निष्क्रिय केले, परंतु हल्ल्यांचा परिणाम अजूनही विनाशकारी होता, अशी माहिती युक्रेनियन हवाई दलाने दिली.
जीवित आणि मालमत्तेचे नुकसानकीवच्या गव्हर्नर मायकोला कलाश्निक यांनी माहिती देताना सांगितले की, ड्रोन हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आणि इतर तीन जण जखमी झाले. काही निवासी इमारती आणि पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच मॉस्को आणि कीव यांच्यात थेट चर्चा सुरू असतानाच हा हल्ला झाला आहे. मात्र, शुक्रवारी झालेल्या या बैठकीत युद्धबंदी किंवा कोणत्याही तोडग्यावर एकमत होऊ शकले नाही. फेब्रुवारी २०२२मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले होते, ज्याला आता ३ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.