रशिया-युक्रेन युद्धात नवा 'ट्विस्ट'; पुतीन यांचा ब्रिटनवर निशाणा? 'या' घटनेने माजली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 21:46 IST2025-03-06T21:43:54+5:302025-03-06T21:46:11+5:30
Russian Warship, Russia Ukraine War: युक्रेनमध्ये सध्या तणाव शिगेला पोहोचला आहे. तशातच ही घटना घडल्याने सारेच 'सतर्क' झालेत

रशिया-युक्रेन युद्धात नवा 'ट्विस्ट'; पुतीन यांचा ब्रिटनवर निशाणा? 'या' घटनेने माजली खळबळ
Russian Warship, Russia Ukraine War: रशियन युद्धनौका इंग्लिश बेल्टमध्ये दिसल्याने पाश्चिमात्य देश चिंतेत आहेत. अलिकडेच एक रशियन युद्धनौका बंदी घातलेल्या रशियन मालवाहू जहाजासह कालव्यावरून जाताना दिसली. तिथे मोठ्या प्रमाणात सशस्त्र सैनिक तैनात होते, तरीही ती युद्धनौका तेथून गेली. या घटनेबद्दल ब्रिटिश आणि बेल्जियन नौदल सतर्क झाले असून या रशियन ताफ्यावर लक्ष ठेवले जात आहे. युक्रेनमध्ये सध्या तणाव शिगेला पोहोचला आहे. तसेच अमेरिकेने ब्रिटनच्या स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रांना निष्क्रिय केले आहे. असे असताना अमेरिकेचा मित्रदेश असलेला रशियाच्या युद्धनौका प्रतिबंधित क्षेत्रात विहार करत असल्याने पुतीन यांच्या निशाण्यावर आता ग्रेट ब्रिटेन असल्याचे बोलले जात आहे.
रशियन युद्धनौकांवरून शस्त्रांस्त्रांची वाहतूक?
बंदी घातलेल्या रशियन जहाज 'बाल्टिक लीडर'ला इंग्लिश बेल्टमधून नेण्यात आले. यादरम्यान, एक रशियन नौदल अधिकारी मशीन गन फिरवताना दिसला, ज्यामुळे पाश्चात्य देशांच्या चिंता आणखी वाढल्या. द टाईम्सने शेअर केलेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट दिसून आले की रशियन नौदल या जहाजाचे संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. २०२२ मध्ये अमेरिकेने 'बाल्टिक लीडर'वर बंदी घातली होती, कारण ते रशियासाठी लष्करी शस्त्रांची वाहतूक करत होते. आता यावेळी हे जहाज सीरियातील टार्टस येथील रशियन लष्करी तळावरून शस्त्रास्त्रे घेऊन रशियाला परतत असल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेन युद्धात रशियन सैन्याची क्षमता बळकट करण्यासाठी ही शस्त्रास्त्रे पाठवण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
ब्रिटिश-बेल्जियन नौदल 'अलर्ट'
तीन मार्चला पहाटे पाच वाजता 'बाल्टिक लीडर' टोर्कीच्या दक्षिणेस घेऊन जाण्यास सुरुवात झाली. या रशियन ताफ्याच्या हालचालींवर ब्रिटिश आणि बेल्जियन नौदलाचे लक्ष होते. ब्रिटिश रॉयल नेव्ही युद्धनौका HMS सोमरसेट आणि बेल्जियन नौदलाचे NS क्रोकस यांनी या ताफ्याचा पाठलाग सुरू केला. 'बाल्टिक लीडर'ने चार मार्चला दुपारी दोन वाजताच्या सुमारास इंग्लिश चॅनेल सोडले, परंतु या घटनेने ग्रेट ब्रिटेन आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांना सावध केले आहे. पाश्चात्य सुरक्षा संस्था या संपूर्ण घटनेचे गांभीर्य ओळखून रशियाच्या लष्करी हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.