PM Narendra Modi Vladimir Putin: सध्या भारताचे अमेरिकेसोबत राजकीय आणि व्यापारी संबंध तणावपूर्ण झाले आहेत. याचदरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे भारतात येत आहेत. गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी मॉस्कोमध्ये म्हटले की राष्ट्रपती पुतिन या वर्षाच्या अखेरीस भारताला भेट देतील. रशियन राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौऱ्याची बातमी अशा वेळी आली आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या रशियन तेल खरेदीवर संताप व्यक्त करून, भारतावरील शुल्क ५०% ने वाढवले आहे.
रशियन वृत्तसंस्था इंटरफॅक्सने यांनी वृत्त दिले होते की, अजित डोभाल यांनी अध्यक्ष पुतिन ऑगस्टच्या अखेरीस भारताला भेट देतील असे वक्तव्य केले आहे. परंतु, नंतर बातमीत सुधारणा करताना एजन्सीने म्हटले होते की अध्यक्ष पुतिन २०२५च्या अखेरीस भारताला भेट देतील.
ट्रम्पचा तीळपापड, भारतावर ५०% कर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी भारतावर २५% कर लादला होता. रशियन तेल खरेदीच्या संदर्भात भारतावरील अमेरिकेचा कर वाढवला जाईल, असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. ते म्हणाले होते, "भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे, आणि खरेदी केलेल्या तेलाचा मोठा भाग खुल्या बाजारात विकून मोठा नफाही कमवत आहे. रशियाची युद्धयंत्रणा युक्रेनमध्ये किती लोकांना मारत आहे याची भारताला पर्वा नाही. हे पाहता, मी भारतावरील कर वाढवणार आहे."
ट्रम्प यांची कृती अतार्किक
त्यानंतर, बुधवारी ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५% कर लावण्याची घोषणा केली, ज्यामुळे एकूण कर ५०% झाला आहे. भारतावरील हा ५०% कर ट्रम्पचा कार्यकारी आदेश जारी झाल्यानंतर २१ दिवसांनी लागू होईल. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांच्या अतिरिक्त कर लादण्याचे वर्णन अतार्किक असल्याचे म्हटले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, ही कृती विचित्र, अन्यायकारक, अनावश्यक आणि अतार्किक आहे.