पक्ष्यांच्या थव्याला धडकल्यानं विमानाचं इंजिन फेल, 233 प्रवासी थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 17:49 IST2019-08-15T17:49:07+5:302019-08-15T17:49:50+5:30
रशियातलं एक विमान दुर्घटनाग्रस्त होता होता थोडक्यात बचावलं आहे.

पक्ष्यांच्या थव्याला धडकल्यानं विमानाचं इंजिन फेल, 233 प्रवासी थोडक्यात बचावले
मॉस्कोः रशियातलं एक विमान दुर्घटनाग्रस्त होता होता थोडक्यात बचावलं आहे. मॉस्कोच्या विमानतळावरून उड्डाण घेतलेलं विमान शहरापासून काही अंतर दूर गेल्यानंतर एका पक्ष्यांच्या थव्याला धडकलं. अशा परिस्थितीत विमानाला पुढे नेणं धोक्याचं असल्याचं लक्षात आल्यावर वैमानिकानं त्या विमानाचं तात्काळ लँडिंग केलं. त्या विमानाच्या वैमानिकानं एका मक्याच्या शेतातच ते विमान उतरवलं आणि 233 प्रवासी अपघातग्रस्त होता होता थोडक्यात बचावले.
वैमानिकानं प्रसंगावधान दाखवल्यानं 233 प्रवाशांचा जीव वाचला आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, या इमर्जन्सी लँडिंगमध्ये 23 प्रवासी जखमी झाले आहेत. परंतु इतर कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यूराल एअरलाइन्सचं विमान एअरबस 321नं मॉस्कोहून उड्डाण भरलं होतं. शहरातल्या दक्षिण पूर्व भागात विमान पोहोचताच त्याचं एका शेतात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. विमानाच्या इंजिनमध्ये अनेक पक्षी अडकल्याची भीती सतावत असल्यानं ते पुढे नेणं धोक्याचं होतं. म्हणूनच वैमानिकानं तात्काळ त्या विमानाचं लँडिंग केलं.
रशियातल्या झुकोवस्की या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानानं उड्डाण केल्यानंतर ते फक्त एक किलोमीटरपर्यंत दूर गेलं होतं आणि त्याचदरम्यान त्याला खाली उतरवावं लागलं आहे. रशियाच्या सरकारी वृत्तवाहिनी हा चमत्कार असल्याचं सांगितलं आहे. पायलटनं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे जवळपास 233 प्रवाशांचा जीव बचावला आहे.