सुपरह्युमन बनवण्याच्या बापाच्या वेड्या अट्टहासापायी चिमुकल्याचा जीवच घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 06:24 AM2024-04-23T06:24:51+5:302024-04-23T06:25:11+5:30

लहान बाळांसाठी आईचं दूध हा सर्वोत्तम आहार मानला जातो. गरजेप्रमाणे लहान मुलांना पाणीही पाजलं जातं; पण मॅक्झिमनं कॉसमॉसला वेगळाच आहार सुरू केला

Russian influencer, Maxim Lyutyi, has been sentenced to eight years in prison for the death of his one-month-old son | सुपरह्युमन बनवण्याच्या बापाच्या वेड्या अट्टहासापायी चिमुकल्याचा जीवच घेतला

सुपरह्युमन बनवण्याच्या बापाच्या वेड्या अट्टहासापायी चिमुकल्याचा जीवच घेतला

प्रत्येकजण आयुष्यभर काही ना काही ‘प्रयोग’ करीत असतो. काहीजण हा प्रयोग स्वत:वर करतात, काहीजण इतरांवर करतात, तर काही जण आपल्या मुलांवर प्रयोग करतात. उद्येश एकच.. ‘मोठं’ होणं, नाव कमावणं, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं यासाठी काहीतरी धडपड करीत राहाणं... ही धडपड बऱ्याचदा चांगली असते, तर बऱ्याचदा ती विकृतीकडेही झुकते. आपल्या डोक्यात ठाम घुसलेल्या संकल्पना ‘सिद्ध’ करण्यासाठी आपल्याला वाटेल तेच करीत राहणं हेही अनेकदा दिसतं. 

असाच अतिरेक नुकताच पाहायला मिळाला. रशियन इन्फ्लुएन्सर मॅक्झिम ल्यूटी याचं तरुणाईत फारच प्रस्थ. आपल्या वेगन लाइफस्टाइलसाठी तो रशियात प्रसिद्ध आहे, पण त्याहीपेक्षा आरोग्य, व्यायाम हा त्याच्या आवडीचा विषय आहे. त्यासाठी सोशल मीडियावर तो नेहमीच आपले काही ना काही प्रयोग टाकत असतो. तरुणाईत ते प्रचंड लोकप्रिय आहेत आणि लोक त्याचं अनुकरणही करतात. मॅक्झिमला अलीकडेच मुलगा झाला. आपलं मूल जगात सर्वांत चांगलं, सर्वांत सुंदर, सर्वांत आरोग्यदायी, सर्वांत बलवान असावं असं अनेकांना वाटतं. अर्थातच मॅक्झिमही त्याला अपवाद नव्हता. आपल्या मुलाचं आणि पर्यायानं आपलंही जगात नाव व्हावं यासाठी मुलांच्या जन्मापासूनच त्यानं मुलावर अनेक ‘प्रयोग’ करायला सुरुवात केली. मॅक्झिमलाही आपल्या मुलाला सुपरह्युमन बनवायचं होतं. त्यात अतींद्रिय शक्ती असावी, असं त्याला वाटत होतं. मुलाच्या जन्मापासूनच खरं तर त्याच्याही खूप आधीपासूनच त्यानं त्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली.

अनेक पालक आपल्या मुलांनाच प्रयोगशाळा बनवतात, तसंच मॅक्झिमनंही आपल्या मुलाला एक प्रयोगशाळा बनवलं.  त्यासाठी त्यानं काय करावं?  मुलाचा जन्म हॉस्पिटलमध्ये नाही तर, घरीच ‘नॅचरल’ पद्धतीनं हाेऊ द्यायचा, हा सर्वांत पहिला निर्णय. त्यासाठी त्यानं आपल्या बायकोला, ओक्साना मिरोनोवा हिला दवाखान्यात जाण्यास मनाई केली आणि बाळंतपणासाठी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये नव्हे, तर घरीच तिची प्रसूती हाेऊ द्यायची असा निर्णय घेतला. या निर्णयानुसार तिची प्रसूती घरीच झाली. या निर्णयाला तिची ओक्सानाची मान्यता नव्हती; पण मॅक्झिमच्य हट्टापुढे तिचं काहीच चाललं नाही. 

मुलाचा जन्म झाल्यापासून तत्क्षणी त्याचं सगळं डाएट आणि त्याचा आहार-विहार त्यानं आपल्या ताब्यात घेतला. मुलाला काय खाऊ-पिऊ घालायचं, त्याला कसं सर्वशक्तिमान बनवायचं, यासाठीचा एक आराखडाच त्यानं तयार केला. त्यानुसार एकेक प्रयोग तो मुलावर करू लागला. कॉसमॉस हे मुलाचं नाव. लहान बाळांसाठी आईचं दूध हा सर्वोत्तम आहार मानला जातो. गरजेप्रमाणे लहान मुलांना पाणीही पाजलं जातं; पण मॅक्झिमनं कॉसमॉसला वेगळाच आहार सुरू केला. बाळाच्या शरीराच्या आध्यात्मिक ऊर्जेवर सकारात्मक प्रभाव पडावा यासाठी त्यानं त्याला कठोर शाकाहारी ‘प्राण’ आहार चालू केला. त्याचं शरीर बळकट व्हावं, कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यानं लहानपणापासूनच तयार व्हावं यासाठी जन्मत:च त्याला थंडगार पाण्यात टाकण्याचाही प्रयोग त्यानं केला. लहान बाळांसाठी योग्य असा आहार देण्याऐवजी त्यानं कॉसमॉसला ‘सन डाएट’ चालू केला. सन डाएट म्हणजे काही दिवसांच्या या लहान बाळाला सूर्यप्रकाशात, उन्हात ठेवण्याचा प्रयोग त्यानं चालू ठेवला.  

हे सगळे अतिरेकी प्रयोग कॉसमॉस सहन करू शकला नाही. लगेचच तो आजारी पडला. तरीही मॅक्झिमचे प्रयोग संपले नाहीत. त्यानं मुलाला दवाखान्यात भरती केलं नाही. कुपोषण, खाण्यापिण्याच्या कमतरतेमुळे कॉसमॉसचा अशक्तपणा आणखी वाढला. त्याला न्यूमोनियाही झाला. तो अगदी अखेरच्या घटका मोजायला लागल्यावर त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं; पण दुर्दैवी कॉसमॉस वाचू शकला नाही. आपल्या बाळाला सुपरह्युमन बनवण्याच्या बापाच्या वेड्या अट्टहासापायी जन्मानंतर केवळ काही दिवसांतच त्याला हे जग सोडून जावं लागलं!..

बाळावर अत्याचार; आईबापाला शिक्षा
कॉसमॉसच्या मृत्यूला जबाबदार ठरवून कोर्टानं मॅक्झिमला आठ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याच वेळी त्याची बायको ओक्साना हिलादेखील दोषी ठरवत न्यायालयानं तिला दोन वर्षांच्या कठोर सार्वजनिक सेवेची (पब्लिक सर्व्हिस) शिक्षा सुनावली आहे. ओक्सानाच्या बहिणीनं न्यायालयाला सांगितलं, स्वत:च्या खोट्या प्रतिष्ठेपायी लहानग्या कॉसमॉसवर मॅक्झिमनं अतिशय अत्याचार केले. बाळाला सुपरह्युमन बनवण्याच्या नादात त्यानं त्याचा जीव घेतला. बाळाचा वापर करून त्याला स्वत:ची प्रसिद्धी वाढवून घ्यायची होती!...

Web Title: Russian influencer, Maxim Lyutyi, has been sentenced to eight years in prison for the death of his one-month-old son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.