Russia-Ukraine War: रशियाने चुकून आपल्याच सैनिकांवर केला हल्ला, युक्रेनने मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 17:14 IST2022-05-11T17:13:44+5:302022-05-11T17:14:00+5:30
Russia-Ukraine War: युक्रेनियन सैनिक समजून रशियाने आपल्या सैनिकांवर फ्लेमथ्रोवरने हल्ला केला. यात अनेक सैनिकांचा होरपळून मृत्यू झाला.

Russia-Ukraine War: रशियाने चुकून आपल्याच सैनिकांवर केला हल्ला, युक्रेनने मानले आभार
Russia-Ukraine War:रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला अडीच महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त केली आहेत. दरम्यान, रशियन लष्कराने चुकून आपल्याच सैनिकांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी यासाठी रशियाचे आभारही मानले आहेत.
आपल्या सैनिकांवर फ्लेमथ्रोवरने हल्ला केला
द मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान व्लादिमीर पुतिन यांच्या लष्कराला आणखी एक धक्का बसला आहे. रशियन सैनिक चुकून त्यांच्याच सैन्याकडून मारले गेले. रशियन सैन्याने आपल्या सैनिकांवर फ्लेमथ्रोवरने हल्ला केला. रशियन सैन्य हल्ला करत होते, तेव्हा ते युक्रेनच्या सैनिकांना नव्हे तर आपल्या सैनिकांना मारत आहेत, याची त्यांना जाणीवही नव्हती.
युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली माहिती
रशियाच्या सैनिकांवर त्यांच्याच लष्कराने केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी रशियाचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, रशियन सैन्याने आम्हाला मदत केली, त्याबद्दल धन्यवाद. युक्रेनच्या झापोरिझ्झ्या प्रांतात ही घटना घडली आहे. मात्र, लष्कराच्या या चुकीवर रशियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यात त्यांचे किती सैनिक मारले गेले याची माहिती नाही.
पुतिन दीर्घ युद्धाच्या तयारीत
दरम्यान, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने रशिया-युक्रेन युद्धाबाबत इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनमध्ये दीर्घ युद्धाची तयारी करत आहेत. अहवालानुसार, रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण सुरू केल्यापासून राजधानी कीवमधील 390 इमारती नष्ट झाल्या आहेत, त्यापैकी 222 निवासी अपार्टमेंट आहेत.