Russia vs Ukraine War: भयंकर! बुचा हत्याकांडाचा युक्रेनकडून बदला; जखमी रशियन सैनिकांना भररस्त्यात गोळ्या घातल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 09:17 IST2022-04-07T09:16:21+5:302022-04-07T09:17:51+5:30
Russia vs Ukraine War: युक्रेनच्या सैनिकांकडून रशियन सैनिकांच्या हत्या; संपूर्ण रस्त्यावर रक्ताचा सडा

Russia vs Ukraine War: भयंकर! बुचा हत्याकांडाचा युक्रेनकडून बदला; जखमी रशियन सैनिकांना भररस्त्यात गोळ्या घातल्या
कीव्ह: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्धाला तोंड फुटून दीड महिना होत आला आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांकडून आता नृशंस हल्ले केले जात आहेत. राजधानी कीव्हपासून जवळ असलेल्या बुचा शहरात रशियन सैनिकांनी युक्रेनच्या सामान्य नागरिकांच्या हत्या केल्या. त्यांच्यावर अतिशय जवळून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर आता युक्रेनी सैन्यानं रशियन सैनिकांच्या हत्या केल्या आहेत.
पश्चिम कीव्हमधील एका गावात युक्रेनी सैन्यानं काही रशियन सैनिकांना पकडलं. त्या सैनिकांची युक्रेनी सैन्याकडून हत्या करण्यात आली. त्या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. न्यूयॉर्क टाईम्सनं हा व्हिडीओ खरा असल्याचं वृत्त दिलं आहे. 'हा अजून जीवंत आहे. या लुटारूंचं चित्रण करा. बघा, हा अजून जिवंत आहे. याचा श्वास सुरू आहे,' असं एक व्यक्ती म्हणत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
व्हिडीओमध्ये एका जखमी रशियन सैनिकानं स्वत:चं डोकं जॅकेटनं झाकून घेतलेल्या स्थितीत दिसत आहे. एक युक्रेनी सैनिक त्याला गोळी घालतो. त्यानंतरही रशियन सैनिकाच्या शरीराची हालचाल जाणवते. त्यानंतर युक्रेनी सैनिक त्याला पुन्हा गोळी घालतो. या सैनिकाचे हात मागे बांधलेले दिसत आहेत. मृत सैनिकानं पांढऱ्या रंगाचा बँड परिधान केला आहे. रशियन सैनिक बहुतेकदा असा बँड परिधान करतात.
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, हा व्हिडीओ दिमित्रिक्वा गावाच्या उत्तरेकडे असलेल्या रस्त्यावर चित्रित करण्यात आला आहे. रस्त्यावर सैनिकांची शस्त्रं, बूट आणि हेल्मेट अस्ताव्यस्त पडलेली दिसत आहेत. दिमित्रिक्वा गाव बुचापासून ११ किलोमीटरवर आहे. बुचामध्ये काही दिवसांपूर्वीच युक्रेनी नागरिकांचे ४०० हून अधिक मृतदेह आढळून आले. या नागरिकांची हत्या रशियन सैनिकांनी घडवल्याचा आरोप होत आहे. त्याच हत्येचा बदला म्हणून युक्रेनी सैनिकांनी रशियन सैनिकांना ठार केलं आहे.