Russia vs Ukraine War: युद्धाचा राग रशियन बॉसवर काढला; युक्रेनच्या खलाशानं ५८ कोटींची यॉट बुडवली; पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 15:52 IST2022-03-01T15:49:02+5:302022-03-01T15:52:30+5:30
Russia vs Ukraine War: रशिया युक्रेनवर करत असलेल्या हल्ल्यांचा राग युक्रेनी खलाशानं रशियन मालकावर काढला

Russia vs Ukraine War: युद्धाचा राग रशियन बॉसवर काढला; युक्रेनच्या खलाशानं ५८ कोटींची यॉट बुडवली; पण...
कीव: रशिया विरुद्ध युक्रेन युद्धाचा आजचा दिवस सहावा दिवस आहे. युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्यासाठी रशियाचे प्रयत्न सुरू आहेत. रशियन सैन्य कीवच्या सीमेपर्यंत पोहोचलं आहे. राजधानी वाचवण्यासाठी युक्रेनी सैन्याचा संघर्ष सुरू आहे. युक्रेनच्या नागरिकांमध्ये हल्लेखोर रशियाबद्दल प्रचंड संताप आहे.
रशियन बॉसला धडा शिकवण्यासाठी एका युक्रेनी खलाशानं त्याचं आलिशान जहाज बुडवण्याचा प्रयत्न केला. स्पेनमध्ये ही घटना घडली. जहाज बुडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या खलाशाला अटक करण्यात आली. रशियातील शस्त्रास्त्र कंपनी रोसोबोरोन एक्सपोर्टचे संचालक अलेक्झांडर मिखीव यांच्याकडे एक सुपरयॉट आहे. त्यावर युक्रेनी नागरिक खलाशी म्हणून कार्यरत होता. रशियानं मायदेशावर हल्ला केल्याचं त्यानं टीव्हीवर पाहिलं. याचा बदला म्हणून त्यानं रशियन बॉसचं आलिशान जहाज बुडवण्याचा निर्णय घेतला.
अलेक्झांडर मिखीव यांच्या सुपरयॉटचं नाव अनास्टासिया आहे. यॉट १५७ फूट लांबीची असून तिची किंमत ५८ कोटी रुपये इतकी आहे. स्पेनच्या मेजोर्का बंदरात जहाज उभं असताना युक्रेनी नागरिकानं तिचे व्हॉल्व उघडले. त्यामुळे जहाज काही प्रमाणात बुडालं. यानंतर युक्रेनी नागरिकाला सिव्हिल गार्ड्सनी अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. आपल्याला कृत्याचा कोणताही पश्चाताप नसल्यानं खलाशानं न्यायाधीशांना सांगितलं.
रशियन सैन्य युक्रेनमध्ये घुसून हल्ले करत असल्याचा व्हिडीओ पाहिल्याचं खलाशानं सांगितलं. रशियन सैन्य निष्पाप नागरिकांना लक्ष्य करत आहे. त्यामुळे रशियन मालकाचं जहाज बुडवण्याचं ठरवलं असं तो पुढे म्हणाला. अलेक्झांडर मिखीव यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अलेक्झांडर मिखीव शस्त्रास्त्रं निर्यातीचा व्यवसाय करतात. त्यांची कंपनी रणगाड्यांपासून लढाऊ विमानं, जहाजांपर्यंत अनेक शस्त्रास्त्रं निर्यात करते.