Russia vs Ukraine War: मुलींवर बलात्कार करतोय, कुत्रे खातोय! रशियन सैनिकांच्या 'क्लिप'नं खळबळ; युद्धाचा क्रूर चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 08:01 IST2022-04-01T07:59:58+5:302022-04-01T08:01:43+5:30
Russia vs Ukraine War: रशियन सैनिकांचा क्रूर कारनामे रेडिओ संवादातून उघडकीस

Russia vs Ukraine War: मुलींवर बलात्कार करतोय, कुत्रे खातोय! रशियन सैनिकांच्या 'क्लिप'नं खळबळ; युद्धाचा क्रूर चेहरा
कीव्ह: युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन महिना उलटला आहे. युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हं सध्यातरी दिसत नाहीत. रशियाच्या तुलनेत कमकुवत असलेलं युक्रेनचं सैन्य आठवड्याभरात शरणागती पत्करेल असा व्लादिमीर पुतीन यांचा अंदाज होता. मात्र तो साफ चुकला. युक्रेनच्या लष्करानं कडवी लढत देत रशियन फौजांचं मोठं नुकसान केलं. युद्धाचा क्रूर चेहरा दाखवणाऱ्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. त्यात आता रशियन सैनिकांच्या एका ऑडिओ क्लिपची भर पडली आहे.
युक्रेनियन सिक्युरिटी सर्व्हिसेस रशियन सैनिकांचा त्यांच्या मायदेशातील आप्तांसोबत सुरू असलेला संवाद रेकॉर्ड केला आहे. त्यातून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. रशियन सैनिक अल्पवयीन मुलींवर बलात्कार करत असल्याचं, कुत्र्यांना मारून खात असल्याचा उल्लेख यात आहे. हा संवाद त्यांच्या ग्रामीण भाषेत आहे. ब्रिटिश वृत्तपत्र असलेल्या मिररनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
इथे आमच्यासोबत रणगाडा चालवणारे तीन जण आहेत आणि त्यांनी मुलीवर बलात्कार केला आहे, असं एक रशियन सैनिक रेडिओवरून सांगत आहे. त्यानंतर पलीकडून एका महिलेचा आवाज येतो. कोणी बलात्कार केला, अशी विचारणा ती करते. त्यावर रणगाडा चालवणाऱ्या तिघांनी बलात्कार केला. ती १६ वर्षांची होती, असं उत्तर रशियन सैनिक देतो. आपल्या सैनिकांनी बलात्कार केला का, असा प्रश्न महिला विचारते. त्यावर रशियन सैनिक होय असं उत्तर देतो.
दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये दोन पुरुषांचा आवाज आहे. त्यातला एक रशियन सैनिक आहे. रशियात असलेली व्यक्ती रेडिओवरून युद्धावर असलेल्या रशियन सैनिकाला त्याच्या खाण्यापिण्याविषयी विचारते. तुम्हाला नीट जेवण मिळतंय ना, असा प्रश्न रशियन व्यक्ती विचारते. त्यावर रशियन सैनिक फार वाईट जेवण मिळत नाही असं उत्तर देतो. पुढे हा सैनिक आपण काल कुत्रा खाल्ल्याचं सांगतो. त्यावर पलीकडे असलेली व्यक्ती काय खाल्लं, असा प्रश्न विचारते. त्यावर रशियन सैनिक कुत्रा असं उत्तर देतो.
तुम्ही कुत्रे मारून का खाताय, तुमच्याकडे खायला काहीच नाही का, असे प्रश्न रशियन नागरिक सैनिकाला विचारतो. त्यावर आमच्याकडे तयार अन्न आहे. पण तेच तेच खाऊन आम्हाला कंटाळा आला आहे. आम्हाला मांस खायचं होतं. त्यामुळे कुत्रे मारून खाल्ले, असं रशियन सैनिक सांगतो.