Russia vs Ukraine War: लेट पण थेट! युक्रेननं ज्यांची वाट पाहिली, त्यांची युद्धात एंट्री होण्याची शक्यता; पुतीन यांना धक्का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 14:59 IST2022-03-15T14:56:55+5:302022-03-15T14:59:27+5:30
Russia vs Ukraine War: ३० हजार सैनिक, ५० युद्धनौका, २०० लढाऊ विमानं; पुतीन यांचे डावपेच हाणून पाडण्यासाठी रणनीती

Russia vs Ukraine War: लेट पण थेट! युक्रेननं ज्यांची वाट पाहिली, त्यांची युद्धात एंट्री होण्याची शक्यता; पुतीन यांना धक्का?
ओस्लो: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्धाला तोंड फुटून तीन आठवडे होत आले आहेत. युक्रेननं नाटो संघटनेचा सदस्य होऊ नये म्हणून रशियानं युद्ध पुकारले. त्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी नाटोकडे मदत मागितली. मात्र नाटोनं सैनिक पाठवण्यास नकार दिला. नाटोचे सदस्य असलेल्या काही देशांनी युक्रेनला लष्करी साहित्य पुरवलं. त्याच्या जोरावर युक्रेननं बलाढ्य रशियाला चांगली लढत दिली. यानंतर आता युद्धात नाटोची थेट एंट्री होण्याची शक्यता आहे.
युक्रेन-रशिया यांच्यात युद्ध सुरू असताना नाटोनं रशियाच्या सीमेजवळ नॉर्वेमध्ये शक्तिप्रदर्शन सुरू केलं आहे. या लष्करी अभ्यासात ३० हजार सैनिकांचा, ५० युद्धनौका आणि २०० लढाऊ विमानांचा समावेश आहे. नाटोनं नॉर्वेत एक विमानवाहू नौका, एक विनाशिका आणि एक पाणबुडी पाठवली आहे. या युद्ध सरावानंतर नाटो युक्रेनमध्ये उतरेल अशी दाट शक्यता आहे. उत्तर युरोपमधील हालचाली रशियासाठी स्पष्ट इशारा मानला जात आहे.
नॉर्वेत युद्ध सराव करत असलेले ३० हजार सैनिक २८ युरोपीय देश आणि अमेरिकेचे आहेत. सोमवारपासून युद्ध सरावाला सुरुवात झाली. एक महिना हा सराव चालेल. युद्ध सरावासाठी नॉर्वेची करण्यात आलेली निवड अनेकार्थांनी महत्त्वाची आहे. नॉर्वेची २०० किमीची सीमा रशियाला लागून आहे. या युद्ध सरावाला कोल्ड रिस्पॉन्स असं नाव देण्यात आलं आहे.
रशियानं युक्रेनवर हल्ला करण्याआधीच युद्धाभ्यासाची योजना आखण्यात आली होती, असं नाटोनं सांगितलं आहे. या अभ्यासात रशियाला पर्यवेक्षक करण्याचा प्रस्ताव नाटोनं फेटाळला आहे. रशियन सैन्य आणि संरक्षण मंत्रालयाला या सरावाची सूचना दिल्याचं नॉर्वेच्या लष्करानं सांगितलं आहे. कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून रशियाला आधीच माहिती दिल्याचं नॉर्वेनं म्हटलं आहे.