Ukraine Russia war: युक्रेनला नो फ्लाय झोन बनवण्यास नकार; झेलेंस्कींनी NATO ला सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 10:03 IST2022-03-05T10:03:31+5:302022-03-05T10:03:52+5:30
युक्रेनला नो-फ्लाय झोन घोषित करण्यास नकार दिल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनवर (नाटो) कडाडून टीका केली आहे

Ukraine Russia war: युक्रेनला नो फ्लाय झोन बनवण्यास नकार; झेलेंस्कींनी NATO ला सुनावलं
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध (Russia Ukrain War) सुरू होऊन आता नऊ दिवस पूर्ण झाले आहेत. युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्याचे युक्रेनच्या विविध शहरांमध्ये सातत्याने सुरू आहेत. दरम्यान, युक्रेनला नो-फ्लाय झोन घोषित करण्यास नकार दिल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनवर (नाटो) कडाडून टीका केली आहे. तसं न करता आता पाश्चात्य लष्करी आघाडीने रशियन हल्ल्यांना ग्रीन सिग्नल दिला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
रशिया हल्ले सुरू करेल आणि त्यात लोकांचा मृत्यू होईल हे माहित असूनही नाटोने युक्रेनवरील उड्डाणे बंद करण्याचा निर्णय जाणूनबुजून घेतला नाही. युक्रेनियन शहरे आणि गावांवर आणखी रशियन बॉम्बहल्ला करण्यासाठी नाटोने ग्रीन सिग्नल दिला असल्याचं शुक्रावारी एका व्हिडीओद्वारे झेलेंन्स्की यांनी सांगितलं.
यापूर्वी शुक्रवारी, नाटोने रशियाकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी नो-फ्लाय झोन सुरू करण्याची युक्रेनची विनंती नाकारली. मात्र, पाश्चिमात्य देशांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युद्ध न थांबविल्यास त्यांच्यावर नवीन निर्बंध घालण्याचा इशाराही दिला आहे. लष्करी आघाडी युक्रेनमध्ये 'नो फ्लाय झोन' लागू करणार नाही. अशा निर्णयामुळे अण्वस्त्र असलेल्या रशियासोबत युरोपात एक मोठं युद्ध सुरू होऊ शकतं. यामध्ये अनेक देश सामील होतील आणि मोठी समस्या निर्माण होईल, असं नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग म्हणाले.
अमेरिकेकडूनही नाटोची बाजू
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनीही नाटोची बाजू घेतली आणि युक्रेनवर नो-फ्लाय झोनची मागणी नाकारली. नो-फ्लाय झोन म्हणजे रशियन विमाने पाडण्यासाठी नाटोची विमानं युक्रेनियन हवाई क्षेत्रात पाठवावी लागतील. यामुळे युरोपमध्ये भयंकर युद्ध होऊ शकतं, असं ते म्हणाले.