युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 20:37 IST2024-05-05T20:35:43+5:302024-05-05T20:37:20+5:30
Ukraine President Volodymyr Zelensky, Russia Most Wanted List: रशियाने वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या कशाचा आधारवर या यादीत केला समावेश, जाणून घ्या कारण

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
Ukraine President Volodymyr Zelensky, Russia Most Wanted List: रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून युद्ध सुरु आहे. या युद्धात अनेकांचे बळी गेले. तरीही अद्याप हे युद्ध शमण्याचे नाव घेत नाहीये. या संदर्भात रशियाने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचा 'मोस्ट वॉन्टेड' यादीत समावेश केला आहे. रशियन प्रसारमाध्यमांनी शनिवारी गृह मंत्रालयाच्या डेटाबेसचा हवाला देत ही माहिती दिली. शनिवारी दुपारपर्यंत, झेलेन्स्की आणि त्यांचे सहकारी पेट्रो पोरोशेन्को हे दोघांवरही गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप लावत त्यांचा वॉन्टेड लोकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. रशियन अधिकाऱ्यांनी झेलेन्स्की आणि पोरोशेन्को यांच्यावरील आरोप त्वरित स्पष्ट केलेले नाहीत. पण स्वतंत्र रशियन न्यूज आउटलेट मीडियाझोना ने शनिवारी दावा केला की या दोघांचे गेल्या अनेक महिन्यांपासून या यादीत नाव होते.
रशियाने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचा मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश केला असल्याचे रशियाच्या स्टेट मीडियाने गृह मंत्रालयाच्या डेटाबेसचा हवाला सांगितले. असे असले तरीही या अहवालात झेलेन्स्कीचा मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश असल्याबाबतची फारशी माहिती देण्यात आलेली नाही. रशियाने म्हटले आहे की झेलेन्स्कींना 'गुन्हेगारीशी संबंधित आरोपांच्या आधारावर यादीत समाविष्ट केले गेले आहे. रशियाने या यादीत दुसऱ्या देशाच्या बड्या नेत्याचा समावेश करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनशी संघर्ष सुरू झाल्यापासून रशियाने अनेक युक्रेनियन आणि इतर युरोपियन राजकारण्यांसाठी अटक वॉरंट जारी केले आहेत. रशियन पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये एस्टोनियन पंतप्रधान काजा कॅलास, लिथुआनियाचे सांस्कृतिक मंत्री आणि पूर्वीच्या लाटवियन संसद सदस्यांना सोव्हिएत काळातील स्मारके नष्ट केल्याबद्दल मोस्ट-वॉन्टेड यादीत ठेवले होते. रशियाने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या वकिलासाठी अटक वॉरंटही जारी केले. या वकिलाने गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासाठी युद्धासंबधी गुन्ह्यांच्या आरोपाखाली वॉरंट तयार केले होते.