Russia-Ukraine War: निर्लज्जपणाचा कळस! 'युक्रेनी महिलांवर बलात्कार कर'; रशियन सैनिक-पत्नीचे फोनवर संभाषण रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 14:55 IST2022-04-15T14:53:02+5:302022-04-15T14:55:07+5:30
Russian Husband-Wife Conversation on Rape: रशियाचे सैनिक युक्रेनी महिला, तरुणींवर बलात्कार करत आहेत. यानंतर त्यांना ठार केले जात आहे किंवा जखमी अवस्थेत सोडून दिले जात आहे.

Russia-Ukraine War: निर्लज्जपणाचा कळस! 'युक्रेनी महिलांवर बलात्कार कर'; रशियन सैनिक-पत्नीचे फोनवर संभाषण रेकॉर्ड
युक्रेन युद्धाच्या पन्नासाव्या दिवशी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियन महिला आपल्या सैनिक पतीला युक्रेनी महिलांवर बलात्कार करण्यास सांगत आहे. या दोघांमधील फोनवरील संभाषण इंटरसेप्ट करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
या रशियन महिलेने आपल्या पतीला हे सर्व करताना आपल्य़ा सुरक्षेची काळजी घेण्यासही सांगितले आहे. युक्रेनची न्यूज वेबसाईट Ukrinform.net ने आपल्या वृत्तात याचा गौप्यस्फोट केला आहे. द सिक्योरिटी सर्विस ऑफ द यूक्रेनच्या इंटरसेप्टरने रशियन सैनिक आणि त्याच्या पत्नीची फोनवरील चर्चा रेकॉर्ड केली आहे. या दोघांमध्ये युक्रेनी महिलांवर बलात्कार करण्यावर चर्चा झाली आहे. हा ऑडिओ टेलिग्राम चॅनलवर देखील व्हायरल झाला आहे.
रशियाचे सैनिक युक्रेनी महिला, तरुणींवर बलात्कार करत आहेत. यानंतर त्यांना ठार केले जात आहे किंवा जखमी अवस्थेत सोडून दिले जात आहे. फोनवर ही महिला हसत हसत तिच्या पतीला म्हणतेय की, युक्रेनी महिलांवर बलात्कार कर आणि मला त्याबाबत नाही सांगितलेस तरी चालेल. यावर तो सैनिक म्हणतो की अच्छा मला बलात्कार करावा लागेल आणि तुला काहीच सांगायचे नाहीय का... यावर ती म्हणते की, तु तुझ्या सुरक्षेसाठी हे सर्व करू शकतो.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियन सैनिकांनी शेकडो महिलांवर बलात्कार आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हा ऑडिओ आला आहे. अनेक युक्रेनी महिलांनी त्यांच्या मुलांसमोर, पतीसमोर बलात्कार केल्याचे आरोप केले आहेत. पतीसमोर बलात्कार करून त्याला नंतर मारण्यात आल्याचेही दावे करण्यात आले आहेत. असे करताना या सैनिकांकडे ड्रग्ज आणि व्हायग्रादेखील असते असे एका पीडित महिलेने म्हटले आहे.