Russia vs Ukraine War: ...म्हणून आम्ही भारताकडे मदत मागतोय! 'महाभारत' सांगत युक्रेनची कळकळीची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 20:45 IST2022-02-24T20:43:38+5:302022-02-24T20:45:00+5:30
Russia vs Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात; युक्रेनची भारताकडे मदतीसाठी याचना

Russia vs Ukraine War: ...म्हणून आम्ही भारताकडे मदत मागतोय! 'महाभारत' सांगत युक्रेनची कळकळीची विनंती
नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं. रशियाच्या सैन्यानं युक्रेनमध्ये प्रवेश केला आहे. बॉम्बवर्षावानं अनेक शहरं हादरली आहेत. युक्रेननं रशियाची ६ विमानं पाडली आहेत. रशियाचे ५० सैनिक ठार झाले आहेत. तर युक्रेनचे ४० सैनिक मारले गेल्याचा दावा रशियानं केला आहे. युक्रेनचं लष्करी विमान क्यिवजवळ कोसळलं आहे. यात १४ जण होते. रशियाचं सैन्य सामर्थ्य पाहता त्यासमोर युक्रेनचा निभाव लागणं अवघड आहे. त्यामुळे युक्रेननं भारताकडे मदतीसाठी याचना केली आहे.
भारतातील युक्रेनचे राजदूत डॉ. आइगर पोलिखा यांनी पंतप्रधान मोदींकडे मदतीचं आवाहन केलं आहे. भारतातील महान कूटनीतीतज्ज्ञ चाणक्य आणि महाभारताची आठवण पोलिखा यांनी करून दिली. एक मजबूत जागतिक शक्ती असल्याच्या नात्यानं भारतानं युक्रेनची मदत करावी, असं आवाहन पोलिखा यांनी केलं.
तुमच्या देशात चाणक्यसारखी अतिशय बुद्धिवान व्यक्ती होऊन गेली. आजपासून दोन हजार चारशे वर्षांपूर्वी युरोपात कोणतीही संस्कृती अस्तित्वात नव्हती. मात्र त्यावेळी भारतात अतिशय उत्तम कूटनीती होती, असं पोलिखा म्हणाले. त्यांनी भारताला महाभारताचीही आठवण करून दिली. 'महाभारतातलं युद्ध रोखण्यासाठी संवाद झाला. युद्ध टाळण्याचा प्रयत्न झाला. मात्र दुर्दैवानं तो प्रयत्न अपयशी ठरला. मात्र आमच्या बाबतीत संवाद यशस्वी होईल,' अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
भारताच्या तटस्थ भूमिकेची आठवणदेखील पोलिखा यांनी करून दिली. 'भारत अनेक वर्षांपासून तटस्थ गटाचं नेतृत्त्व करत आला आहे. आजही करत आहे. शीतयुद्धापासून याची सुरुवात झाली. तणाव कमी करणं हा त्यामागचा हेतू होता. भारत पंचशीलच्या सिद्धातांचं पालन करतो हे विसरू नका. त्यामुळे आम्ही भारताकडे मदतीची याचना करत आहोत,' असं पोलिखा म्हणाले.