Ukraine Russia War: भारत आणि रशियामध्ये झालेला करार रद्द होणार? रशियन राजदूतांनी दिली महत्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 17:14 IST2022-03-02T17:13:07+5:302022-03-02T17:14:26+5:30
Ukraine Russia War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे रशियाकडून भारताला मिळणाऱ्या S-400 एअर डिफेन्स सिस्टीमच्या वितरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Ukraine Russia War: भारत आणि रशियामध्ये झालेला करार रद्द होणार? रशियन राजदूतांनी दिली महत्वाची माहिती
नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध (Ukraine Russia War) सलग सातव्या दिवशीही सुरू आहे. अशा स्थितीत रशियासोबतच्या भारताच्या संरक्षण करारांवर त्याचा परिणाम होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रशियावर पाश्चात्य देशांनी लादलेल्या अनेक आर्थिक निर्बंधांमुळे S-400 हवाई संरक्षण प्रणालीच्या(S-400 Air Defence System) वितरणावर परिणाम होऊ शकतो का? याचे उत्तर रशियन राजदूताने दिले.
भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, 'भारताला S-400 एअर डिफेन्स सिस्टिमच्या पुरवठ्याबाबत मला कोणताही अडथळा दिसत नाही. हा करार सुरू ठेवण्यासाठी आमच्याकडे योग्य यंत्रणा आहे. रशिया नेहमीच राखेतून उठला आहे आणि तो पुन्हा उठेल. आम्ही पूर्णपणे सुरक्षित राहण्यासाठी पावले उचलली आहेत',अशी माहिती त्यांनी दिली.
रशिया-भारत S-400 एअर डिफेन्स सिस्टीम करार
भारताला रशियाकडून S-400 हवाई संरक्षण प्रणालीची पहिली खेप मिळाली आहे, परंतु इतर चार वितरित करणे बाकी आहे. आतापर्यंत रशियाकडून डिलिव्हरी होण्यास विलंब होण्याची चिन्हे दिसत नाहीत, परंतु युक्रेनवरील हे संकट दीर्घकाळ चालले तर निश्चितच चिंतेची बाब ठरू शकते. याशिवाय, CAATSA कायद्यांतर्गत खरेदीसाठी अमेरिकेने भारतावर बंदी घातली तर, ही एक चिंतेची बाब असेल. आतापर्यंत अमेरिकेने चीन आणि तुर्कीवर निर्बंध लादले आहेत, मात्र भारताकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
भारताला अधिक नुकसान होण्याची शक्यता
रशिया-युक्रेन संकटामुळे जागतिक बाजारपेठेला धोका कायम आहे. जगभरातील शेअर बाजार वाईट काळातून जात आहेत. काही देशांच्या चलन मूल्यावर परिणाम झाला आहे. या भू-राजकीय तणावाचा वाईट परिणाम जागतिक बाजारपेठेवर दिसू शकतो. प्रसिद्ध वित्तीय आणि संशोधन कंपनी नोमुरा यांच्या अहवालानुसार, युक्रेन संकटामुळे आशियातील सर्वात मोठा परिणाम भारतावर होऊ शकतो.