Russia Ukraine Conflict: ५ तासांपूर्वीच पुतीन यांनी लिहिली यूक्रेनची ‘पटकथा’; संरक्षणमंत्र्यांच्या घड्याळानं झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 14:05 IST2022-02-22T14:04:51+5:302022-02-22T14:05:18+5:30
पूर्व युक्रेनमधील रशियाच्या सीमेला लागून असलेला डोनेस्तक हा एकेकाळी युक्रेनचा सर्वात मोठा औद्योगिक प्रदेश म्हणून गणला जातो.

Russia Ukraine Conflict: ५ तासांपूर्वीच पुतीन यांनी लिहिली यूक्रेनची ‘पटकथा’; संरक्षणमंत्र्यांच्या घड्याळानं झाला खुलासा
नवी दिल्ली – अत्यंत चतुराईसाठी ओळखल्या जाणाऱ्या रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी पुन्हा एकदा जगाला त्यांची रणनीती समजण्यासाठी किती कठीण आहे हे दाखवून दिलं आहे. यूक्रेनमध्ये सध्या जे काही सुरु आहे. जग त्याच्या ५ तास आधी चालत आहे. पुतीन यांनी यूक्रेनची पटकथा जगासमोर आणण्यापूर्वी ५ तास आधीच लिहिली आहे. मीडिया ब्रिफिंगपासून ते डोनेस्तक आणि लुगांस्क स्वतंत्र देश घोषित करणे, सैन्य पाठवणे हे सर्व आदेश ५ तासांपूर्वीच दिले होते.
त्यामुळे पुतीन यांच्या या घोषणेनंतर अमेरिका आणि यूक्रेनला सर्वकाही समजलं तोपर्यंत रशियन सैन्यानं दोन्ही शहरांवर कब्जा करण्याची तयारी केलेली होती. आता डोनेस्तकच्या रस्त्यांवर रशियन टँकर दिसत असल्याचं समोर येत आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, रशिया जगाला सिद्ध करण्यासाठी फक्त तमाशा करत होतं. डोनेस्तक आणि लुगांस्क या देशांना स्वतंत्र देश म्हणून घोषित करणाऱ्या पुतीन यांच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला. त्यावेळी संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांचे घड्याळ पाच तास हळू चालताना दिसले. या सर्व गोष्टींवरून हे भाषण पाच तासांपूर्वी रेकॉर्ड करण्यात आलं होतं हे दिसून येते. म्हणजेच जगाच्या समोर येण्यापूर्वी पाच तास आधी पुतीन यांनी हा निर्णय घेतला होता.
डोनेस्तक आणि लुगांस्कमध्ये काय परिस्थिती आहे?
पूर्व युक्रेनमधील रशियाच्या सीमेला लागून असलेला डोनेस्तक हा एकेकाळी युक्रेनचा सर्वात मोठा औद्योगिक प्रदेश म्हणून गणला जातो. हे डोनबास राज्याचे मुख्य शहर आहे, जेथे अनेक महत्त्वपूर्ण खनिजांचे साठे आहेत. हे शहर युक्रेनमधील प्रमुख स्टील उत्पादक केंद्रांपैकी एक आहे. येथील लोकसंख्या सुमारे २० लाख आहे. त्याच वेळी, लुगांस्क, पूर्वी व्होरोशिलोव्हग्राड म्हणून ओळखले जाणारे, युक्रेनसाठी एक महत्त्वपूर्ण कोळसा खाण आहे. हे शहर डोनबास प्रदेशाचा एक भाग आहे आणि रशियाशी सीमेनजीक आहे. या शहराचा उत्तरेकडील भाग काळ्या समुद्राला लागून आहे.
पुतीन यांचे संरक्षण मंत्रालयाला आदेश
राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पुतीन यांनी फुटीरतावादी-व्याप्त डोनेस्तक आणि लुगांस्क यांना स्वतंत्र देश घोषित केले. हे दोन्ही भाग रशियाच्या सीमेजवळ आहेत. यानंतर लगेचच पुतीन यांनी त्यांच्या संरक्षण मंत्रालयाला या दोन शहरांमध्ये रशियन सैन्य पाठवून शांतता मोहीम राबविण्याचे आदेश दिले. म्हणजेच रशियाने थेट युक्रेनमध्ये लष्करी कारवाईचे आदेश दिले.