Russia vs Ukraine War: युक्रेनवर रशियाने केला ‘हायपरसॉनिक’ हल्ला; भूमिगत शस्त्रागार उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 07:36 IST2022-03-20T07:35:12+5:302022-03-20T07:36:08+5:30
हल्ल्यामुळे युक्रेनी लष्कराचे मोठे नुकसान

Russia vs Ukraine War: युक्रेनवर रशियाने केला ‘हायपरसॉनिक’ हल्ला; भूमिगत शस्त्रागार उद्ध्वस्त
कीव्ह : युद्धाला तोंड फुटून २४ दिवस लोटले तरी युक्रेन शरण येत नसल्याने बिथरलेल्या रशियाने अखेरीस आपल्या भात्यातील प्रभावी अस्त्रे काढली आहेत. शनिवारी रशियाने किन्झॉल या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वापर केला. युक्रेनच्या पश्चिमेला असलेल्या इव्हानो-फ्रँकिव्ह्स्क या प्रांतातील डेलियाटिन या गावावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात युक्रेनी लष्कराने लपवून ठेवलेले भूमिगत शस्त्रागार उद्ध्वस्त झाले.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला शनिवारी २४ दिवस पूर्ण झाले. या युद्धात प्रथमच रशियाने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा हल्ला केला. दरम्यान, कीव्हजवळील माकारिव्ह येथे रशियाने केलेल्या अन्य एका हल्ल्यात सात जण ठार झाले. युक्रेनच्या ओडेसा प्रांतानजीक केलेल्या हल्ल्यात सर्व रेडिओ टेहळणी केंद्रे उद्ध्वस्त झाल्याचा दावा रशियन सैन्याने केला आहे.
‘त्या’ विद्यार्थ्याचे पार्थिव आज भारतात
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये मरण पावलेला भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा ग्यानगौदर याचा मृतदेह सोमवारी, २१ मार्च रोजी बंगळुरू येथे आणला जाण्याची शक्यता आहे. नवीनचे देहदान कर्नाटकमधील एका खासगी रुग्णालयाला करण्याचा निर्णय त्याच्या पालकांनी घेतला आहे.