भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 17:50 IST2025-09-28T17:49:02+5:302025-09-28T17:50:33+5:30
रशियाने युक्रेनवर रविवारी ड्रोन आणि क्षेपणास्त्राने मोठा हल्ला केला. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

फोटो - AP
रशियाने युक्रेनवर रविवारी ड्रोन आणि क्षेपणास्त्राने मोठा हल्ला केला. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात राजधानी कीवला लक्ष्य केलं गेलं. गेल्या महिन्यात कीववर झालेल्या हवाई हल्ल्यात २१ जणांचा मृत्यू झाल्यानंतरचा हा पहिलाच मोठा हल्ला आहे.
कीव शहर प्रशासनाचे प्रमुख तैमूर तकाचेंको यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील निवासी भागांना लक्ष्य करून झालेल्या हल्ल्यात १० जण जखमी झाले. मृतांमध्ये १२ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. शहराच्या मध्यभागी झालेल्या स्फोटातून काळा धूर निघताना दिसत होता.
युक्रेनच्या हवाई दलाने सांगितलं की, रशियाने एकूण ५९५ स्फोटक ड्रोन आणि सिम्युलेटेड शस्त्र आणि ४८ क्षेपणास्त्रे डागली. यापैकी हवाई संरक्षण प्रणालींनी ५६६ ड्रोन आणि ४५ क्षेपणास्त्रे पाडली किंवा ठप्प केली. वलोडिमिर झेलेन्स्की यांनी झापोरिझिया, खमेलनित्स्की, सुमी, मायकोलाईव्ह, चेर्निहिव्ह आणि ओडेसा या भागात बॉम्बस्फोट झाले. देशभरात किमान ४० लोक जखमी झाल्याचं म्हटलं आहे.
कीवचे महापौर विटाली क्लित्स्को यांच्या मते, शनिवारी रात्री सुरू झालेल्या आणि रविवारी पहाटेपर्यंत सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये इमारती, नागरी पायाभूत सुविधा, वैद्यकीय सुविधा आणि एक किंडरगार्टनवर देखील निशाणा साधला. राजधानीत २० हून अधिक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे.