रशियाचा युक्रेनवर ६१९ ड्रोन आणि ५० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी मोठा हल्ला, अनेक शहरांमध्ये प्रचंड विध्वंस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 19:34 IST2025-09-20T19:34:07+5:302025-09-20T19:34:16+5:30
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी युएनमध्ये हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे म्हटले.

रशियाचा युक्रेनवर ६१९ ड्रोन आणि ५० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी मोठा हल्ला, अनेक शहरांमध्ये प्रचंड विध्वंस
कीव: रशियाने युक्रेनच्या विविध शहरांवर मोठे हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. रशियन सैन्याने शनिवारी पहाटे विविध ठिकाणांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले, ज्यामध्ये किमान तीन लोक ठार झाले असून, अनेकजण जखमी झाले आहेत. युक्रेनियन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रशियाने किमान ६१९ ड्रोन आणि ५० हून अधिक बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर केला.
अनेक युक्रेनियन प्रदेश उद्ध्वस्त
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अधिकृत टेलिग्राम अकाउंटवरील निवेदनात म्हटले म्हणाले की, हे हल्ले नऊ प्रदेशांमध्ये झाले, ज्यात डनिप्रोपेट्रोव्स्क, मायकोलाईव्ह, चेर्निहिव्ह, झापोरिझिया, पोल्टावा, कीव, ओडेसा, सुमी आणि खार्किव यांचा समावेश आहे. रशियाला आमच्या पायाभूत सुविधा, निवासी क्षेत्रे आणि गैर-सरकारी आस्थापनांना उद्ध्वस्त करायचे होते. हे हल्ले आमच्या नागरिकांना घाबरवण्याच्या आणि पायाभूत सुविधा नष्ट करण्याच्या रशियाच्या रणनीतीचा भाग आहेत.
WATCH: The moment a Russian missile hit a building in Ukraine's Dnipro this morning. pic.twitter.com/ibYRUz5ogp
— Clash Report (@clashreport) September 20, 2025
युएनमध्ये मुद्दा उपस्थित करणार
झेलेन्स्की पुढे म्हणाले की, पुढील आठवड्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित करणार आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्थानिक गव्हर्नर सेर्ही लिसाक यांनी सांगितले की, युक्रेनच्या मध्यवर्ती डनिप्रोपेट्रोव्हस्क प्रदेशात झालेल्या हल्ल्यात किमान २६ लोक जखमी झाले आहेत. तर, पूर्वेकडील डनिप्रो शहरात अनेक उंच इमारती आणि घरांचे नुकसान झाले. युक्रेनच्या लष्कराने ५५२ ड्रोन, दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि २९ क्रूझ क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे.