रशियात १९५२ नंतरचा सर्वांत मोठा भूकंप; मोठे नुकसान नाही, भूकंपाचे आणखी तीव्र धक्के जाणवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:08 IST2025-07-31T12:08:20+5:302025-07-31T12:08:47+5:30

जपान, हवाई बेटे, पॅसिफिक क्षेत्रातील इतर भागांत त्सुनामीच्या लाटा

russia biggest earthquake since 1952 no major damage more severe aftershocks expected | रशियात १९५२ नंतरचा सर्वांत मोठा भूकंप; मोठे नुकसान नाही, भूकंपाचे आणखी तीव्र धक्के जाणवणार

रशियात १९५२ नंतरचा सर्वांत मोठा भूकंप; मोठे नुकसान नाही, भूकंपाचे आणखी तीव्र धक्के जाणवणार

टोकियो :  १९५२ नंतरचा पॅसिफिक क्षेत्रांतील सर्वांत मोठा म्हणजेच ८.८ रिक्टर स्केलचा भूकंपरशियाच्या किनाऱ्याजवळ झाला असून, रशियासह इतर देशांमध्ये त्सुनामीच्या लाटा धडकल्या. तीव्र भूकंपानंतरही येथे आणखी धक्के (अफ्टर शॉक) जाणवणार असून, ते ८.८ रिक्टर स्केलच्या भूकंपाइतकेच तीव्र असू शकतात, असा इशारा रशियन शास्त्रज्ञांनी दिला आहे.

येथे भूगर्भातील प्लेट्स वेगाने एकमेकांपासून दूर जात असून, येथे भूकंप होणे अपेक्षित आहे. सध्या कुठलीही जीवितहानी न झाल्याची बाब केवळ योगायोग आहे. या भागात लोकसंख्या कमी आहे आणि कोणतेही धोकादायक औद्योगिक केंद्रे जवळपास नाहीत, त्यामुळे हानी टळली. मात्र, भूकंपाचा धोका कायम आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

हवाई, ओरेगॉनमध्ये त्सुनामीचा धोका

अलास्काच्या नॅशनल त्सुनामी वॉर्निंग सेंटरचे समन्वयक डेव स्नायडर यांनी सांगितले की, त्सुनामी ही एकच लाट नसून ती अनेक लाटांचा दीर्घकालीन क्रम असतो. हवाई बेटांचे गव्हर्नर जोश ग्रीन यांनी सांगितले की, जपान व हवाई दरम्यानच्या मिडवे ॲटॉलमध्ये ६ फूट उंचीची लाट नोंदली गेली. हवाईत येणाऱ्या लाटा याहून मोठ्या की लहान असतील, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर व बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया, अमेरिकेच्या वॉशिंग्टन व कॅलिफोर्निया राज्यांसह पॅसिफिक किनाऱ्यांवर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. व्हॅंकुव्हर आयलंडजवळ ३० सेंटीमीटरपर्यंत लाटा येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जपानमध्येही परिणाम

जपानमध्ये त्सुनामीच्या इशाऱ्यामुळे बुधवारी वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. रेल्वे आणि विमानसेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. होक्काईदोच्या हमानाका आणि इवातेच्या कूजी बंदरात ६० सेंटीमीटर उंचीच्या लाटा आल्या. टोकियो खाडीमध्ये भूकंपानंतर पाच तासांनी २० सेंटीमीटर उंचीच्या लाटा दिसल्या. मात्सुशिमा या जपानच्या उत्तर किनारपट्टीवरील शहरात अनेकांनी तात्पुरत्या निवारा केंद्रात आसरा घेतला. 

फिजी, समोआ, टोंगा, मायक्रोनेशिया आदी देशांनाही त्सुनामीचा धोका

फिलिपाइन्समध्ये नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. मेक्सिकोच्या नौदलाने सांगितले की, कॅलिफोर्नियाजवळील एन्सेनाडा येथून मोठ्या लाटा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडने सर्व किनाऱ्यांवर मोठ्या लाटा येण्याचा इशारा दिला आहे. 

फिजी, समोआ, टोंगा, मायक्रोनेशिया व सोलोमन आयलंड्स यांसारख्या देशांनाही त्सुनामीचा धोका आहे. जुलै महिन्यात कामचातकाजवळ समुद्रात ७.४ तीव्रतेच्या सर्वात मोठ्या भूकंपासह पाच तीव्र भूकंप झाले.

जगातील शक्तिशाली भूकंप

१९६० बीओबीओ, चिली - ९.५ रिक्टर स्केल भूकंप तीव्रता, १,६५५ मृत्यू, २० लाख बेघर.

१९६४ अलास्का, अमेरिका - ९.२ रिक्टर स्केल भूकंप तीव्रता, १३० मृत्यू, २.३ अब्ज डॉलर्सचे नुकसान.

२००४ सुमात्रा, इंडोनेशिया - ९.१ रिक्टर स्केल भूकंप तीव्रता,
२,८०,००० मृत्यू, ११ लाख बेघर.

२०११ तोहोकू, जपान - ९.१ रिक्टर स्केल भूकंप तीव्रता, १५,००० मृत्यू, दीड लाख बेघर.

१९५२ कामचटका, रशिया - ९.० रिक्टर स्केल भूकंप तीव्रता
१३० मृत्यू, १० लाख डॉलर्सचे नुकसान

त्सुनामी नेमकी येते कशी, लाटांचा वेग किती?

त्सुनामी ही नैसर्गिक आपत्ती असून ती प्रामुख्याने समुद्राच्या तळाशी होणाऱ्या तीव्र भूकंपांमुळे उद्भवते. कधी कधी ज्वालामुखी, भूस्खलन किंवा हिमनग समुद्रात कोसळणे यामुळेही त्सुनामी येऊ शकते. खोल समुद्रात या लाटा जेट विमानाच्या गतीने प्रवास करतात. मात्र, किनाऱ्याजवळ येताना त्या मंदावतात आणि एकत्र येऊन मोठा प्रभाव निर्माण करतात. यामुळे मोठे नुकसान होते. 

टेक्टॉनिक म्हणजे?

समुद्राच्या तळाखाली भूकंप झाल्याने समुद्रातील पाणी आणि जमिनीला हादरा बसतो. काही सेकंदांतच खूप मोठी ऊर्जा तयार होते.

लाटा का येतात?

ही ऊर्जा पाण्यात एक विशेष प्रकारच्या  लाटांमध्ये पसरते. या लाटा सुरुवातीला फारशा उंच नसतात; पण त्या वेगात सगळीकडे पसरतात.

दुसरी लाट येते एका तासाने?

या त्सुनामीच्या लाटा खूप लांब अंतरापर्यंत जातात. एका लाटेपासून दुसरी लाट येण्यास लागणारा वेळ पाच मिनिटांपासून एक तासापर्यंत असतो.

लाटांची उंची का वाढत जाते? किती होते नुकसान?

जेव्हा या लाटा किनाऱ्याच्या जवळ येतात, तेव्हा समुद्र कमी खोल असतो. त्यामुळे लाटांचा वेग कमी होतो; पण त्याची उंची वाढते. लाटा अधिक उंच आणि जोरदार बनतात. यामुळे नुकसान वाढते.

८०५.६७ कि.मी. तास समुद्रात लाटांचा वेग या लाटा वर्तुळाकार स्वरूपात पुढे जातात 

धडक आणि मोठा नाश

शेवटी या उंच लाटा (कधी ५ ते १० मीटर किंवा त्याहून अधिक) किनाऱ्यावर आदळतात. तेव्हा जबरदस्त फटका बसतो. इमारती, झाडे, वाहने, लोक वाहून जातात. लाट गेल्यावर परत समुद्राकडे परतणाऱ्या पाण्यामुळेही मोठे नुकसान होते.

रिंग ऑफ फायर 

'रिंग ऑफ फायर' म्हणजे पृथ्वीवरचा एक मोठा भाग, जो प्रशांत महासागराच्या भोवती आहे. आणि जिथे भूकंप व ज्वालामुखी खूप जास्त होतात. या ठिकाणी अंदाजे ७५% सक्रिय ज्वालामुखी आणि ९०% भूकंप होतात. जपान, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, अमेरिका ,  चिली, रशिया आणि न्यूझीलंड हे देश या भागात येतात.
 

Web Title: russia biggest earthquake since 1952 no major damage more severe aftershocks expected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.