सुदानमध्ये उपासमारीशी झुंजत असलेल्या लोकांवर RSFचा भीषण हल्ला, १०० हून अधिक जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 09:47 IST2025-04-13T09:47:12+5:302025-04-13T09:47:39+5:30
Attack in Sudan: गेल्या अनेक वर्षांपासून अशांत असलेल्या सुदानमधील दार्फुर भागात शुक्रवारपासून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक लोक मारले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुदानमध्ये उपासमारीशी झुंजत असलेल्या लोकांवर RSFचा भीषण हल्ला, १०० हून अधिक जणांचा मृत्यू
गेल्या अनेक वर्षांपासून अशांत असलेल्या सुदानमधील दार्फुर भागात शुक्रवारपासून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक लोक मारले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतांमध्ये २० मुलांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. हा हल्ला रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) या पॅरामिलिट्री समुहाने केल्याचे सांगण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरएसएफने एल-फाशर शहर आणि जवळच्या जमजम आणि अबू शौक येथील निर्वासितांच्या तळांवर हल्ले केले.
संयुक्त राष्ट्रांची एक शाखा असलेल्या ओसीएचएने शनिवारी सांगितले की, या हल्ल्यांमुळे आधीच उपासमारीचा सामना करत असलेल्या या तळांमध्ये परिस्थिती आणखीच बिघडली आहे. आंदोलक समुहांपैकी एक असलेल्या जनरल कोऑर्डिनेशनल ऑफ डिस्प्लेस्ड पर्सन्स अँड रिफ्युजीजने सांगितले की, हे हल्ले गुरुवारी सुरू झाले, तसेच शनिवारपर्यंत सुरू होते. या हल्ल्यांमध्ये निवासी भाग, बाजार आणि आरोग्य केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. त्यात शेकडो लोक मारले गेले. तसेच अनेक जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि मुलींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. संघटनेने हे हल्ले युद्ध गुन्हेगारी आणि मानवतेविरोधातील गुन्हा असल्याचा आरोप केला आहे.
मात्र आरएसएफने हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच जमजम कॅम्पवर सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आलेले नाही, असे सांगितले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा सैन्याकडून पसरवण्यात येत असलेला प्रोपेगेंडा आहे, त्यामध्ये बनावट दृश्यांचा समावेश असून, त्यामाध्यमातून आरएसएफला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावाही आरएसएफने केला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांसंबंधीच्या कायद्यांबाबत आपल्या असलेल्या कटीबद्धतेचा आरएसएफने पुनरुच्चार केला आहे. तसेच लष्कराकडून खऱ्या गुन्ह्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही केला आहे.