डोमिनिकन रिपब्लिकची राजधानी असलेल्या सँटो डोमिंगो येथे मंगळवारी सकाळच्या सुमारास एक भयावह दुर्घटना घडली. येथे एका नाईट क्लबमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट सुरू असतानाच अचानकपणे स्लॅब अथवा छत कोसले. या दुर्घटनेत तब्बल ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर किमान १६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सँटो डोमिंगो येथील प्रसिद्ध नाईट क्लब 'जेट सेट' मध्ये ही दुर्घटना घडली. 'जेट सेट' नाईट क्लब हे सँट डोमिंगोतील एक प्रमुख सांस्कृतिक स्थळ मानले जाते. यावेळी अनेक हाय-प्रोफाइल लोक उपस्थित होते. यात राजकारणी, खेळाडू आणि संगीत प्रेमींचा समावेश होता. क्लबचे छत कोसळल्याने अनेक जण त्याखाली दबले गेले.
या दुर्घटनेनंतर, तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यात आले. दरम्यान, "आम्हाला विश्वास आहे की, त्यांपैकी अनेक लोक अद्यापही जिवंत आहेत आणि ढिगाऱ्याखालील शेवटची व्यक्ती जोवर बाहेर येणार नाही, तोवर येथील स्थानिक सरकार हार मानणार नाही," असे आपत्कालीन ऑपरेशन सेंटरचे संचालक जुआन मॅन्युएल मेंडेझ यांनी म्हटले होते. महत्वाचे म्हणजे घटनेच्या १२ तासांनंतरही परिस्थिती गंभीर होती. अग्निशमन दलाचे जवान लोकांना ढिगाऱ्याखालून काढण्यासाठी लाकडी फळ्या आणि ड्रिलचा वापर करत होते.
या दुर्घटनेतील मृतांमध्ये, माजी मेजर लीग बेसबॉल ऑल-स्टार नेल्सन क्रूझ यांची बहिण तथा मॉन्टेक्रिस्टि प्रांताच्या गव्हर्नर नेल्सी क्रूझ यांचाही समावेश आहे. फर्स्ट लेडी रॅकेल अर्बाजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेल्सी क्रूझ यांनी राष्ट्रपती लुइस अबिनाडेर यांना रात्री 12:49 वाजण्याच्या सुमारास एक इमरजन्सी कॉल केला होता. यात त्यांनी आपण ढिगाऱ्याखाली अडको असल्याचे म्हटले होते. यानंतर, रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तसेच, ही एक मोठी शोकांतिका असल्याचेही अरबाजे यांनी म्हटले आहे.
या दुर्घटनेने केवळ डोमिनिकन रिपब्लिकच नव्हे, तर संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. या घटनेनंतर सरकारने पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत आणि बचाव कार्यांना प्राधान्य दिले आहे.