ब्रिटनमधील साऊथपोर्टमध्ये भडकली दंगल, दंगेखोरांकडून मशिदीवर हल्ला, समोर आलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 15:27 IST2024-08-01T15:26:50+5:302024-08-01T15:27:21+5:30
Riot in Southport in Britain: ब्रिटनमधील साऊथपोर्ट येथे सोमवारी झालेल्या चाकूहल्ल्यामध्ये तीन मुलींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगळवारी या परिसरात भीषण दंगल उसळली असून, त्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

ब्रिटनमधील साऊथपोर्टमध्ये भडकली दंगल, दंगेखोरांकडून मशिदीवर हल्ला, समोर आलं धक्कादायक कारण
ब्रिटनमधील साऊथपोर्ट येथे सोमवारी झालेल्या चाकूहल्ल्यामध्ये तीन मुलींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगळवारी या परिसरात भीषण दंगल उसळली असून, त्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच कट्टरतावादी आंदोलकांनी साऊथपोर्टमधील एका मशिदीला लक्ष्य करून तिच्यावर हल्ला केला. एवढंच नाही तर दंगल रोखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांसोबतही या दंगेखोरांचा आमना-सामना झाला. त्यात ३९ पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाल्याचं वृत्त आहे.
सोमवारी साऊथपोर्टमधील हर्ट स्ट्रीटवर असलेल्या हर्ट स्पेस स्टुडियोमध्ये चाकूहल्ला झाला होता. या हल्ल्याविरोधात शहरातील मध्यातून एक शांततामय मार्गाने मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये मृत मुलींना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो लोक सहभागी झाले होते. याच दरम्यान, मोर्चामधील एक गट शहरातील मशिदीजवळ गोळा झाला. त्यांनी दगड, बाटल्या, फटाके आदि वस्तूंद्वारे मशिदीवर हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी झालेल्या चाकूहल्ल्यामधील आरोपी हा इस्लामशी संबंधित असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. त्या अफवेमुळे आंदोलक हे संतप्त झालेले होते. दरम्यान, या चाकूहल्ल्यात सहभागी असलेल्या १७ संशयिताचा इस्लामशी संबंध नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.