निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 19:56 IST2025-05-27T19:55:05+5:302025-05-27T19:56:53+5:30
जगभरात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने अमेरिकेच्या संरक्षणविषयक धोरणावर नाराजी व्यक्त करत अणुयुद्धाचा इशारा दिला आहे.

निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
जगभरात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने अमेरिकेच्या संरक्षणविषयक धोरणावर नाराजी व्यक्त करत अणुयुद्धाचा इशारा दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात 'गोल्डन डोम' संरक्षण प्रणालीची आखणी करण्यात येत आहे. ही प्रणाली क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी अवकाशात तैनात केली जाणार आहे. मात्र उत्तर कोरियाने या निर्णयाला आक्रमक विरोध दर्शवला आहे.
उत्तर कोरियाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “अमेरिका युद्धसदृश परिस्थिती निर्माण करत आहे. जर त्यांनी तात्काळ आपली भूमिका बदलली नाही, तर अणुयुद्धाला कोणीही अडवू शकणार नाही.”
गोल्डन डोम आणि उत्तर कोरियाची अस्वस्थता
उत्तर कोरियाच्या सरकारच्या मते, ही प्रणाली केवळ अमेरिकेपुरती मर्यादित राहणार नाही. दक्षिण कोरिया आणि जपानसारख्या अमेरिकेच्या घट्ट सहयोगी राष्ट्रांमध्येही तिची स्थापना होण्याची शक्यता आहे. ही दोन्ही राष्ट्रे उत्तर कोरियाचे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानली जातात. उत्तर कोरियाला वाटते की, गोल्डन डोम मुळे या देशांची सुरक्षा वाढेल आणि उत्तर कोरियाची स्थिती कमकुवत होईल.
उत्तर कोरिया वेळोवेळी जपान व दक्षिण कोरियाला लष्करी इशारे देत आला आहे. उत्तर कोरियाकडे आधुनिक शस्त्रास्त्रांचा मोठा साठा असूनही, गोल्डन डोम प्रणालीमुळे त्याचा प्रभाव कमी होईल, अशी भीती किम जोंग उन यांना वाटते.
अण्वस्त्रांचा साठा आणि धोका
अमेरिकन थिंक टँकच्या अंदाजानुसार, उत्तर कोरियाकडे सध्या सुमारे ५० अणुबॉम्ब आहेत आणि आणखी ९० अण्वस्त्र तयार होण्याच्या प्रक्रियेत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने अमेरिकेला आणि त्यांच्या सहयोगींना दिलेली धमकी गंभीर मानली जात आहे.
अलीकडेच अमेरिकेने दक्षिण कोरियासोबत केलेल्या लष्करी सरावानंतर, किम जोंग उन यांच्या बहिणीनेही तीव्र प्रतिक्रिया दिली होती. “आम्ही शस्त्रे केवळ प्रदर्शनासाठी बनवत नाही,” असे तिने म्हटले होते.