जहाजांवरील हल्ल्यांचा बदला; अमेरिका, ब्रिटनचा हौतींवर हवाई हल्ला; मध्य पूर्वेतील तणाव वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 12:50 PM2024-01-13T12:50:47+5:302024-01-13T12:51:59+5:30

हवाई हल्ले करण्यात ब्रिटनच्या लष्कराचाही सहभाग

retaliation for attacks on ships; US, UK airstrike on Houthis; Tensions in the Middle East will increase | जहाजांवरील हल्ल्यांचा बदला; अमेरिका, ब्रिटनचा हौतींवर हवाई हल्ला; मध्य पूर्वेतील तणाव वाढणार

जहाजांवरील हल्ल्यांचा बदला; अमेरिका, ब्रिटनचा हौतींवर हवाई हल्ला; मध्य पूर्वेतील तणाव वाढणार

दुबई: तांबड्या समुद्रात जहाजांवर येमेनच्या हौती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांना तिखट प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच्यावर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील मित्र देशांच्या फौजेने शुक्रवारी हवाई हल्ले केले. त्यामध्ये पाचजण ठार व सहाजण जखमी झाल्याची माहिती हौतींनी दिली. हे हवाई हल्ले करण्यात ब्रिटनच्या लष्कराचाही सहभाग होता. या सर्व घटनांमुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

इस्रायल व हमास यांच्यातील संघर्षामुळे मध्य पूर्वेतील स्थिती अस्थिर बनली आहे. अमेरिकेने हौतींवर केलेल्या हवाई हल्ल्याने त्यात भर पडली आहे. अमेरिकेने हौतींच्या कोणत्या ठिकाणावर हल्ला केला हे स्पष्ट झालेले नाही. इराणचे हौती यांना समर्थन आहे. अमेरिकेने हवाई हल्ले केल्याच्या घटनेपासून सौदी अरेबियाने स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. येमनमधील संघर्षात युद्धविराम व्हावा तसेच इराणशी असलेले संबंध बिघडू नये म्हणून सौदी अरेबिया काळजी घेत आहे.

भारतीय नौदलाच्या युद्धनौका ठरल्या कर्दनकाळ

समुद्री चाच्यांपासून जहाजांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाच्या आतापर्यंत दहा युद्धनौका अरबी समुद्रापासून ते एडनच्या आखातापर्यंत तैनात करण्यात आल्या आहेत. त्यातील ३ युद्धनौका नौदलाने गेल्या २६ डिसेंबर रोजी तैनात केल्या होत्या. नंतर त्यात आणखी सात युद्धनौकांची भर घालण्यात आली. नौदलप्रमुख चिफ ॲडमिरल आर. हरिकुमार यांनी सांगितले की, गेल्या ४२ दिवसांत विविध जहाजांवर हल्ले होण्याच्या ३५ घटना घडल्या. ज्या जहाजांवर हल्ले झाले त्यांच्या कर्मचारी वर्गात भारतीयांचा समावेश होता. या हल्ल्यांची माहिती कळताच भारतीय नौदलाने तत्काळ कारवाई करून या जहाजांना संकटातून वाचविले होते. (वृत्तसंस्था)

ब्रिटनला मोठी किंमत चुकवावी लागेल’

  • ब्रिटनने आमच्यावर केलेल्या हल्ल्यांची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा हौतींनी दिला आहे. 
  • हौतींचे प्रवक्ता मोहम्मद अब्दुल सालम यांनी सांगितले की, अमेरिका, ब्रिटनने हल्ले केल्यामुळे आम्ही अजिबात विचलित होणार नाही. पॅलेस्टाइनमधील लोकांना आम्ही यापुढेही पाठिंबा देत राहणार आहोत.


इराणचा पाठिंबा असल्याने...

  • अमेरिकेने हौतींवर केलेल्या हल्ल्याचा इस्रायल व हमासच्या संघर्षावरही परिणाम होऊ शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलने लष्करी कारवाई थांबवावी म्हणून प्रयत्न सुरू केले होते.
  • मात्र, इराणचा पाठिंबा असलेले हौती, लेबनॉनमधील दहशतवादी
  • यांच्याकडून इस्रायलविरोधात आणखी कारवाया करण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. 
  • अमेरिकेच्या नेत हौतींच्या किमान पाच ठिकाणांवर हल्ले चढविले असल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्याला दोन्ही बाजूंनी दुजोरा दिलेला नाही. 

Web Title: retaliation for attacks on ships; US, UK airstrike on Houthis; Tensions in the Middle East will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.