Omicron Variant: धक्कादायक! ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकाला धमकी; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 12:55 IST2021-12-13T12:54:39+5:302021-12-13T12:55:10+5:30
या प्रकरणाचा आता तपास सुरु झाला आहे. प्रोफेसर ओलिविएरा हे ते वैज्ञानिक आहेत ज्यांनी कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शोध लागल्याची घोषणा केली होती.

Omicron Variant: धक्कादायक! ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकाला धमकी; नेमकं काय घडलं?
जोहान्सबर्ग – कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं पुन्हा एकदा कोरोनाची भीती जगातील अनेक देशांच्या मनात निर्माण केली आहे. डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिएंट अधिक घातक नसला तरी तो वेगाने सगळीकडे पसरत आहे. सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंटची ओळख पटली. त्यानंतर हळूहळू जगातील इतर देशांत या व्हेरिएंटचा शिरकाव झाला. भारतातही ओमायक्रॉनचे ३८ रुग्ण आढळले आहेत.
यातच दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शोध घेणाऱ्या वैज्ञानिकाला धमकी मिळाली आहे. त्याचा पोलीस तपास करत आहे. पोलीस सर्व्हिसचे राष्ट्रीय प्रवक्ते विष्ण नायडू यांनी संडे टाइम्सला सांगितले की, राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांच्या कार्यालयाला धमकीचं पत्र देण्यात आले आहे. ज्यात प्रोफेसर तुलियो डी ओलिविएरासह अनेक वैज्ञानिकांचा उल्लेख करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा आता तपास सुरु झाला आहे. प्रोफेसर ओलिविएरा हे ते वैज्ञानिक आहेत ज्यांनी कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शोध लागल्याची घोषणा केली होती. नायडू म्हणाले की, एक आठवड्यापूर्वी ही घटना आमच्यासमोर आली. तक्रारकर्ते राष्ट्रीय कोरोना कमांड परिषदेचे सल्लागार असल्याने या तपासाला प्राधान्य देण्यात आले आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
वैज्ञानिकांना टार्गेट करणं चुकीचं
राष्ट्रपती प्रवक्ते टायरोने सिएले यांनी या धमकीच्या पत्रावर माहिती देण्यास नकार देतानाच म्हटलंय की, पत्राच्या वर इशारा असं लिहिलेले आहे. स्टेलेनबोश विश्वविद्यालयाने सुरक्षा वाढवली आहे. प्रोफेसर ओलिविएरा याच विद्यापीठात काम करतात. वैज्ञानिकांना टार्गेट करणं निंदणीय आहे असं विश्वविद्यालयाचे प्रवक्ते मार्टिन विल्जोन यांनी सांगितले. कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. दक्षिण आफ्रिकेत राष्ट्रपती सिरिल रामफोसा कोरोना व्हायरसनं संक्रमित झाले आहेत. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रामफोसा यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आढळली. रविवारी राष्ट्रपती कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. एका कार्यक्रमात बाहेर पडताना राष्ट्रपती रामफोसा यांना अस्वस्थ जाणवू लागलं होतं. त्यानंतर आता रामफोसा यांची तब्येत ठीक आहे. आरोग्य विभाग त्यांच्या तब्येतीवर विशेष लक्ष ठेवून आहेत.