भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:59 IST2025-12-17T17:58:40+5:302025-12-17T17:59:38+5:30
राहुल गांधींच्या या दौऱ्याचे मुख्य आकर्षन बर्लिनमधील भारतीय समुदायाशी होणारा संवाद असेल. या कार्यक्रमाला संपूर्ण युरोपमधील आयओसी अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सहा दिवसांच्या जर्मनी दौऱ्यासाठी बुधवारी बर्लिन येथे पोहोचले. या दौऱ्यात ते भारतीय ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्यासोबत जागतिक भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून अनेक महत्त्वाच्या राजनैतिक कार्यक्रमांनाही उपस्थित राहणार आहेत.
बर्लिन विमानतळावर राहुल गांधींचे आगमन झाले तेव्हा त्यांच्या पेहरावाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. भारतात कडाक्याच्या थंडीतही केवळ एका पांढऱ्या टी-शर्टवर दिसणारे राहुल गांधी जर्मनीमध्ये मात्र स्वेटरवर दिसले. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी पांढरा टी-शर्टच आपल्या पेहरावाचा भाग बनवला आहे. मात्र, परदेश दौऱ्यावर प्रदीर्घ काळानंतर ते स्वेटरमध्ये दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
दौऱ्याच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी म्युनिकमधील एका 'बीएमडब्ल्यू वेल्ट' आणि बीएमडब्ल्यू उत्पादन प्रकल्पाला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. "मॅन्युफॅक्चरिंग (उत्पादन क्षेत्र) हा कोणत्याही मजबूत अर्थव्यवस्थेचा कणा असतो, मात्र दुर्दैवाने भारतात यामध्ये घसरण होत आहे. भारताला विकासाची गती वाढवण्यासाठी एका अर्थपूर्ण उत्पादन यंत्रणेची गरज आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.
LoP Shri @RahulGandhi arrived at Berlin Airport, Germany, on his visit from December 15 to 20. pic.twitter.com/nixJZoHH8p
— Congress (@INCIndia) December 17, 2025
प्रवासी भारतीयांशी संवाद -
राहुल गांधींच्या या दौऱ्याचे मुख्य आकर्षन बर्लिनमधील भारतीय समुदायाशी होणारा संवाद असेल. या कार्यक्रमाला संपूर्ण युरोपमधील आयओसी अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. याव्यतिरिक्त, ते जर्मनीचे वरिष्ठ मंत्री आणि खासदारांचीही भेट घेणार आहेत. या बैठकांमध्ये लोकशाही मूल्ये, आर्थिक सहकार्य आणि सामाजिक प्राथमिकता या विषयांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे.