ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; भारतात निघून जा म्हणत बेशुद्ध होईपर्यंत मारलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 17:35 IST2025-07-23T17:33:46+5:302025-07-23T17:35:09+5:30
ऑस्ट्रेलियात एका भारतीय विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; भारतात निघून जा म्हणत बेशुद्ध होईपर्यंत मारलं
Australia Indian Student Attack: ऑस्ट्रेलियातील अॅडलेड शहरात शनिवारी एका भारतीय विद्यार्थ्यावर क्रूर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली. सेंट्रल अॅडलेडमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली. पाच जणांच्या गटाने हा केला. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे आणि उर्वरितांचा शोध सुरू आहे. भारतीय विद्यार्थ्यावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चरणप्रीत सिंग त्याच्या पत्नीसोबत शहरातील लाईट शो पाहण्यासाठी कारमधून बाहेर निघाला होता. यादरम्यान, रात्री ९ वाजता किंटोर अव्हेन्यूजवळ कार पार्किंगवरून त्याचा स्थानिकांशी वाद झाला. त्यांनी चरणप्रीतला वांशिक शिवीगाळ केली आणि त्याच्यावर हिंसक हल्ला केला. चरणप्रीत सिंगवर धारदार वस्तूंनी हल्ला करण्यात आला. हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ज्यामध्ये हल्लेखोर अपशब्द वापरताना दिसत आहेत. चरणप्रीत सिंग तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना हल्लेखोर त्याला लाथा आणि ठोसे मारताना दिसत आहेत.
व्हिडीओमध्ये पाच जण चरणप्रीतच्या चेहऱ्यावर आणि पोटावर ठोसे आणि लाथा मारताना दिसत आहेत. त्याची पत्नी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होती. हल्लेखोरांच्या हातात धारदार वस्तूही होत्या. हल्ल्यानंतर आरोपी त्यांच्या गाडीत बसले आणि चरणप्रीतला बेशुद्ध अवस्थेत सोडून गेले. चरणप्रीतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रॉयल अॅडलेड रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
"ते मला भारतीयांनो पळून जा असं म्हटलं आणि नंतर मला लाथा आणि मुक्का मारायला सुरुवात केली. मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली," असं चरणप्रीतने सांगितले.
पोलिसांनी याप्रकरणी, एनफिल्डमध्ये एका २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आल्याची माहिती दिली. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी लोकांची मदत मागितली आहे. या हल्ल्यामुळे अॅडलेडमधील भारतीय समुदाय संतप्त झाला आहे. चरणप्रीतच्या समर्थनार्थ अनेक लोक एकत्र आले आहेत आणि त्यांनी या हिंसाचारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, १९ जुलै रोजी आयर्लंडची राजधानी डब्लिनमधील टॅलाघ्ट परिसरात एका ४० वर्षीय भारतीय नागरिकावर हिंसक हल्ला करण्यात आला. पार्कहिल रोडवर हल्लेखोरांच्या एका गटाने पीडितेला घेरले. यामध्ये एका मुलीचाही समावेश होता. त्यांनी भारतीय व्यक्तीला मारहाण करत त्याचे कपडे फाडले आणि त्याला नग्न केले. त्याचे बूट, फोन आणि बँक कार्ड हिसकावून घेतले.