कतारची राजधानी दोहा येथे मंगळवारी जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतारमध्ये या स्फोटानंतर धुराचे लोट देखील दिसले. या स्फोटांमुळे सुरुवातीला गोंधळाचे वातावरण असताना, हा हल्ला हमासच्या नेत्यांवर इस्रायलने केल्याचे समोर आले. या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.
हल्ल्यामागे हमासचे नेतेइस्रायली माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला गाझामधील हमासचा प्रमुख खलील अल-हय्या यांच्यासह अन्य महत्त्वाच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, हे हमासचे प्रतिनिधी अमेरिकेने आणलेल्या नवीन युद्धविराम प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी दोहामध्ये उपस्थित होते. अल-जजीरा वाहिनीने या बातमीला दुजोरा दिला असून, हा हल्ला हमासच्या वाटाघाटी करणाऱ्या टीमवरच झाल्याचे म्हटले आहे.
कतारने केली हल्ल्याची निंदाया हल्ल्यानंतर कतरने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. कतारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते माजेद अल अन्सारी यांनी या हल्ल्याचा निषेध केला. "हा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे घोर उल्लंघन आहे. कतारच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेला यामुळे थेट धोका निर्माण झाला आहे. कतार अशा प्रकारची बेपर्वा कारवाई सहन करणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून, लवकरच अधिक माहिती जाहीर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
युद्धविरामाच्या प्रयत्नांना मोठा धक्कादोहामधील हमासची बैठक अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम घडवून आणण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. मात्र, इस्रायलने हा हल्ला करून शांतता चर्चेला खीळ घालण्याचा प्रयत्न केल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गाझा पट्टीमध्येही इस्रायलचे हल्ले सुरूच असून, त्यात आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात सामान्य नागरिकांचाही समावेश आहे.