झेलेन्स्कींना पुतीन, कमला हॅरिसना डोनाल्ड ट्रम्प...; 81 वर्षांचे बायडेन बरळले, अमेरिकेत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 08:37 IST2024-07-12T08:37:46+5:302024-07-12T08:37:57+5:30
नाटोच्या शिखर संमेलनाचे अमेरिकेत आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बायडेन यांनी संबोधित करताना अक्षम्य चुका केल्या...

झेलेन्स्कींना पुतीन, कमला हॅरिसना डोनाल्ड ट्रम्प...; 81 वर्षांचे बायडेन बरळले, अमेरिकेत खळबळ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि पुढील निवडणुकीचे डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यावरील वाढलेल्या वयाचा परिणाम स्पष्टपणे जाणवू लागला आहे. आधीही अनेकदा ते चालता चालता तोल जाऊन पडलेले आहेत. तसेच बोलताना वेगळ्यांचीच नावे घेतलेली आहेत. आता निवडणुकीच्या प्रचारातही बायडेन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना पुतीन आणि उप राष्ट्रपती कमला हॅरिस यांना डोनाल्ड ट्रम्प या नावाने उल्लेख केल्याने अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
बायडेन एका मागोमाग एक चुका करत सुटले आहेत. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील चर्चांमध्ये देखील ते यामुळे मागे पडत चालले आहेत. ट्रम्प यामुळेच आघाडीवर जात आहेत. अशातच बायडेन यांना हटवून त्यांच्याजागी हॅरिस यांची निवड करावी अशी मागणी होत आहे. अन्यथा ही निवडणूक हरण्याची शक्यता पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे.
नाटोच्या शिखर संमेलनाचे अमेरिकेत आयोजन करण्यात आले आहे. यावेळी झेलेन्स्की यांना बायडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन असे संबोधले. तर पुढे जाऊन हॅरिस यांना डोनाल्ड ट्रम्प म्हटले. यामुळे बायडेन यांना पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेतून हटविण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यांच्या मानसिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत निवडणूक होत आहे. या निवडणुकीत बायडेन पिछाडीवर पडत असल्याचे सांगितले जात आहे. बायडेन असेच बरळत राहिले तर पराभव निश्चित मानला जात आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जर मानसिक संतुलन राखता येत नसेल तर तो निर्णय कसे घेणार, देश कसा चालविणार आणि जगातील एवढ्या समस्या आहेत, त्यांच्याबाबत भुमिका कशा काय घेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. यापूर्वी झालेल्या मागणीवर बायडेन यांनी आपण निवडणुकीतून हटणार नसल्याचे स्पष्ट केले होते.