नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:26 IST2025-09-09T12:54:39+5:302025-09-09T13:26:09+5:30
काठमांडूसह अनेक शहरांमध्ये तरुण आंदोलकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली. आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या खासगी निवासस्थानावर ताबा मिळवून, ते पेटवून दिले आहे.

नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
नेपाळमध्ये सरकारविरोधी हिंसक निदर्शने दुसऱ्या दिवशीही सुरू आहेत. काठमांडूसह अनेक शहरांमध्ये तरुण आंदोलकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली. आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या खासगी निवासस्थानावर ताबा मिळवून, ते पेटवून दिले आहे. सोमवारी गृहमंत्री पदाचा राजीनामा देणारे रमेश लेखक, परराष्ट्र मंत्री डॉ. आरजू राणा देउबा, दळणवळण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग आणि ऊर्जा मंत्री दीपक खड़का यांच्या घरांचीही तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली आहे. आंदोलकांनी रस्त्यांवरील बॅरिकेड्स तोडले असून, ते पुन्हा एकदा संसद भवनाकडे सरकत आहेत.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी नेपाळी काँग्रेस पार्टीच्या ऑफिसला देखील आग लावली. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
VIDEO | Kathmandu, Nepal: Protesters put the ruling Nepali Congress party's office on fire.#NepalProtests#KathmanduProtest
— Press Trust of India (@PTI_News) September 9, 2025
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/eeeISoqOTm
मंत्र्यांच्या राजीनाम्यांचे सत्र सुरू
या निदर्शनांनंतर उपमुख्यमंत्री प्रकाश मान सिंह यांच्यासह अनेक मंत्र्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. सोमवारी गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा दिल्यानंतर, मंगळवारी कृषी मंत्री रामनाथ अधिकारी आणि आरोग्य मंत्री प्रदीप पौडेल यांच्यासह नेपाळी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनीही राजीनामे दिले आहेत. पीपल्स सोशलिस्ट पार्टीचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री प्रदीप यादव यांनीही राजीनामा दिला आहे.
पंतप्रधान ओलींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
माहिती आणि प्रसारण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी सोमवारी पंतप्रधान ओली राजीनामा देणार नाहीत, असे म्हटले होते. मात्र, नेपाळमधील सत्ताधारी आघाडी धोक्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे ओली यांनी आज संध्याकाळी ६ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. "काल राजधानी आणि देशाच्या विविध भागांत झालेल्या निदर्शनांमुळे आणि त्यानंतरच्या घटनांमुळे मी व्यथित आहे," असे ओली यांनी म्हटले आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा राष्ट्रहिताची नाही आणि अशा समस्यांवर केवळ शांततापूर्ण मार्गाने आणि संवादातूनच तोडगा निघू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
नेपाली काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे
सत्ताधारी आघाडीतील नेपाळी काँग्रेसने आपल्या सर्व मंत्र्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. पक्षाचे प्रमुख आणि सरकारमध्ये उपपंतप्रधान असलेल्या प्रकाश मान सिंह, परराष्ट्र मंत्री आरजू राणा देउबा, क्रीडा मंत्री तेजू लाल चौधरी, कायदा मंत्री अजय चौरसिया, ऊर्जा मंत्री दीपक खड़का, वनीकरण मंत्री ऐन बहादुर शाही, आरोग्य मंत्री प्रदीप पौडेल, कृषी मंत्री रामनाथ अधिकारी आणि पर्यटन मंत्री बद्री पांडे यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.