पाकिस्तानला मोठा झटका देण्याची अमेरिकेची तयारी; ट्रम्प प्रशासन उचलणार कठोर पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 19:35 IST2025-03-12T19:34:36+5:302025-03-12T19:35:21+5:30
पाकिस्तानला ऑरेंज कॅटेगिरीत ठेवण्याच्या अमेरिकन हालचालींवर पाकिस्तानातील अमेरिकन राजदूत रिजवान सईद शेख यांनी भाष्य केले

पाकिस्तानला मोठा झटका देण्याची अमेरिकेची तयारी; ट्रम्प प्रशासन उचलणार कठोर पाऊल
वॉशिंग्टन - बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानची रेल्वे हायजॅक करून १०० हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवले आहे. या घटनेने पाकिस्तान सरकारसमोर मोठं आव्हान निर्माण झालं. त्यातच पाकिस्तानसाठी आणखी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेत पाकिस्तानींना प्रवेश बंदी करण्याची तयारी केली आहे. पाकिस्तानला आगामी अमेरिकन प्रवास बंदी यादीत ऑरेंज कॅटेगिरीत ठेवलं जाऊ शकते.
अफगाणिस्तान, इराक, इराण आणि लेबनानसारख्या देशांवर प्रवास निर्बंध लावण्याची शक्यता आहे. लीबिया, फिलिस्तान, सोमालिया, सूडान, सीरिया आणि यमन यांचाही निर्बंध लावलेल्या देशांच्या यादीत समावेश होण्याचा धोका आहे. द न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानी नागरिकांना अमेरिकेत प्रवास करण्यावर पूर्ण निर्बंधाचा सामना करावा लागणार नाही परंतु त्यांना अमेरिकन व्हिसा देताना कठोर तपासणीतून जावं लागेल. पाकिस्तानी नागरिकांसाठी विशिष्ट प्रकारचा व्हिसा तयार केला जाऊ शकतो ज्यात केवळ बिझनेसबाबत प्रवासाला परवानगी मिळेल. ही अमेरिकन इमिग्रेशन आणि प्रवास धोरण बदलण्याचे संकेत असून त्यामुळे हजारो पाकिस्तानींवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानला ऑरेंज कॅटेगिरीत ठेवण्याच्या अमेरिकन हालचालींवर पाकिस्तानातील अमेरिकन राजदूत रिजवान सईद शेख यांनी भाष्य केले. सध्या ही प्रसिद्ध झालेली बातमी आहे. त्या आधारे आम्ही काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. आम्हाला अधिकृतपणे यावर पुष्टी मिळण्याची वाट पाहावी लागेल असं सांगितले. परंतु अमेरिकेत शिकणाऱ्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांना कथितपणे त्यांच्या देशात परत जाण्यास सांगितल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, कौन्सिल ऑन अमेरिकन इस्लामिक रिलेशन्सने मागील आठवड्यात पाकिस्तानसह जवळपास १२ देशातील लोकांना सूचित इशारा दिला आहे. अमेरिकेच्या प्रवास धोरणात जोपर्यंत नवीन घोषणा होत नाही तोवर अमेरिकेचा दौरा करणे टाळावे. यूएसमध्ये येणारे लोक राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण करू नये यासाठी अमेरिकन ट्रम्प सरकार पाऊल उचलत असल्याचं बोललं जात आहे.
पाकिस्तानची इज्जतच काढली
अलीकडेच तुर्कमेनिस्तानमध्ये तैनात असलेले पाकिस्तानी राजदूत यांना वैध व्हिसा आणि सर्व कागदपत्रे असतानाही अमेरिकेत प्रवेश करण्यास रोखले. त्यांना लॉंस एंजिल्सहून पाकिस्तानात डिपोर्ट करण्यात आले. अमेरिकन इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांना विमानतळावरूनच परत पाठवले. राजदूत यांना इमिग्रेशनमध्ये अनेक प्रकारची सूट मिळते परंतु पाकिस्तानी राजदूत केके अहसान वगान यांना कुठलीही सूट अमेरिकेने दिली नाही. या प्रकारामुळे पाकिस्तानची नाचक्की झाली.