डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:52 IST2025-12-18T12:52:23+5:302025-12-18T12:52:51+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा आहे कारण पुढील वर्षी २०२६ रोजी मार्च महिन्यात मिड टर्म निवडणूक होणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
वॉश्गिंटन - फ्री रेशन, बँक खात्यात योजनांच्या नावावर पैसे आणि मोफत आरोग्य उपचार...यासारख्या मोफत सुविधांची खैरात भारतात अनेक सरकार करत असते. निवडणुकीच्या काळात हा खेळ जास्त चालतो. विविध राज्यांमधील मागील निवडणुका पाहिल्या तर प्रत्येक निवडणुकीपूर्वी महिलांसाठी पैसे वाटपाच्या योजना दिसून आल्या. भारतीय राजकारणातील हा फंडा आता अमेरिकेपर्यंत पोहचला आहे.
अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतली १४.५० लाख सैनिकांना १७७६ डॉलर म्हणजे १.६० लाख रुपये क्रिसमसपूर्वी देण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी याला वॉरियर डिविडेंड असं नाव दिले आहे. टॅरिफमधून मिळालेल्या पैशातून हे पैसे वाटले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रम्प यांनी ही घोषणा क्रिसमस ट्री आणि जॉर्ज वॉश्गिंटन यांच्या फोटोसमोर केली. जवळपास १४.५० लाख जवानांना हे पैसे मिळणार आहेत. त्याशिवाय सुट्ट्यांपूर्वी पैसे जवानांपर्यंत पोहचवा अशी सूचना ट्रम्प यांनी प्रशासनाला दिली आहे. हा बोनस मिलिट्री कुटुंबाला त्यांच्यावरील आर्थिक बोझा कमी करण्यास मदत करू शकतो.
निवडणुकीतील फटका कमी करण्यासाठी उचललं पाऊल
डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा आहे कारण पुढील वर्षी २०२६ रोजी मार्च महिन्यात मिड टर्म निवडणूक होणार आहे. अमेरिकेत ज्याप्रकारे ट्रम्प यांची लोकप्रियता वेगाने कमी होत आहे त्यातून या निवडणुकीत ट्रम्प यांना जबरदस्त फटका बसू शकतो असं बोलले जाते. त्यामुळे मोफत खैरात वाटण्याची ही घोषणा मिड टर्म निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली आहे. आता या घोषणेचा ट्रम्प यांना कितपत फायदा होतो हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
काय आहेत मिड टर्म निवडणूक?
अमेरिकन काँग्रेससाठी ही मिड टर्म निवडणूक होणार आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये प्रतिनिधी सभा आणि सिनेट मिळून बनली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड चार वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते तर मध्यावधी निवडणुका दर दोन वर्षांनी होतात. म्हणून त्यांना मिड टर्म निवडणुका म्हणतात. अमेरिकन काँग्रेस राष्ट्राला केंद्रस्थानी ठेवून कायदे करते. कोणत्या कायद्यांवर मतदान करायचे हे प्रतिनिधी सभागृह ठरवते. याउलट सिनेटला हे कायदे रोखण्याचा किंवा मंजूर करण्याचा अधिकार आहे. काही प्रकरणांमध्ये सिनेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या नियुक्त्यांची चौकशी देखील करू शकते.
अमेरिकेत आरोग्य सुविधेची मोठी समस्या
अमेरिकेतील लोकांची कमाई जगातील इतर देशातील लोकांपेक्षा जास्त आहे. परंतु तिथले खर्चही त्या हिशोबाने आहेत. जर हेल्थकेअरबाबत बोलायचे झाले तर अमेरिकेत आरोग्य सुविधा इतर देशांपेक्षा महाग आहे. इथला आरोग्यावरील खर्च इतर विकसित देशांच्या तुलनेने दुप्पट आहे. त्याचे कारण म्हणजे सेवा आणि औषधांच्या वाढत्या किंमती आहे. बहुतांश अमेरिकन लोक हेल्थ इन्शुरन्स आवश्य काढतात. जर हे काढले नाही तर मेडिकल बिल भरणे अशक्य होते.