मोदींच्या उपस्थितीत जितची १६ वर्षांनी पालकांशी पुनर्भेट
By Admin | Updated: August 4, 2014 02:05 IST2014-08-04T02:05:17+5:302014-08-04T02:05:17+5:30
एखाद्या बॉलीवूड चित्रपटातील भावुक दृश्य असावे असे वाटत होते; मात्र तो चित्रपटातील नाही तर खराखुरा प्रसंग होता.

मोदींच्या उपस्थितीत जितची १६ वर्षांनी पालकांशी पुनर्भेट
काठमांडू : एखाद्या बॉलीवूड चित्रपटातील भावुक दृश्य असावे असे वाटत होते; मात्र तो चित्रपटातील नाही तर खराखुरा प्रसंग होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ वर्षांपूर्वी कुटुंबाशी ताटातूट झालेल्या एका नेपाळी तरुणाची रविवारी त्याच्या कुटुंबियांशी पुनर्भेट घडवून आणली.
आता २६ वर्षांचा असलेला जित बहादूर १६ वर्षांपूर्वी भारतात हरवला होता. मोदींना तो अहमदाबादेत सापडला. तेव्हापासून मोदी त्याच्या पालकत्वाची भूमिका पार पाडत आहेत. जितचे कुटुंबीय नेपाळमध्ये राहतात. त्यांच्याशी त्याची पुनर्भेट घडवून आणण्यातही पंतप्रधानांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी येथे आल्यानंतर मोदींनी जितला त्याची आई खागीसारा, मोठा भाऊ दशरथ सारुमगर व लहान बहिणीच्या स्वाधीन केले. या भावुक पुनर्भेटीच्या वेळी दशरथची पत्नी आणि त्याची मुलेही उपस्थित होती. अनेक वर्षांनी तुम्हाला तुमचा मुलगा परत मिळाल्याने निश्चित तुम्ही आनंदी असाल, असे मोदी जितच्या आईला म्हणाले. आपल्या मुलाची काळजी घेतल्याबद्दल आईने मोदींचे आभार मानले. जितचे कुटुंबीय नेपाळच्या नवलपरासी जिल्ह्यातील झोपडपट्टीत राहतात.
१६ वर्षांपूर्वी जित बहादूर हरवला होता. त्याचा भाऊ दशरथने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो जितचा ठावठिकाणा लावू शकला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी जित कायमचा हरवला, असे मानले होते. (वृत्तसंस्था)