पोप फ्रान्सिस यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 16:54 IST2025-02-14T16:53:50+5:302025-02-14T16:54:02+5:30
फ्रान्सिस यांची दररोजच्या तपासणीनंतर त्यांना हॉस्पिटसमध्ये हलविण्यात आले आहे.

पोप फ्रान्सिस यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
पोप फ्रान्सिस यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना रोमच्या जेमेली पॉलीक्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. फ्रान्सिस यांची दररोजच्या तपासणीनंतर त्यांना हॉस्पिटसमध्ये हलविण्यात आले आहे.
पोप फ्रान्सिस यांना ब्राँकायटिसच्या उपचारांसह इतर चाचण्यांसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. ते ८८ वर्षांचे आहे. त्यांना दाखल करण्याचा निर्णय वेटिकनने घेतला आहे.
तरुणपणी ते अर्जेंटिनामध्ये वास्तव्यास होते. तेव्हा त्यांच्या फुफ्फुसाचा एक भाग काढून टाकण्यात आला होता. यामुळे फ्रान्सिसना श्वसनमार्गात संसर्ग होण्याची शक्यता बळावली आहे. फ्रान्सिस यांची प्रकृती आधीपासूनच कमजोर आहे. त्यांना सायटिका आणि गुडघ्याचे दुखणे देखील आहे. यामुळेच ते बऱ्याचदा व्हीलचेअरवर बसलेले दिसतात. २०२१ मध्ये त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही झालेली आहे. २०२३ मध्येही त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
फ्रान्सिस हे जानेवारीमध्ये दोनवेळा घरातच घसरून पडले होते. यामुळे त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. परंतू फ्रॅक्चर झाले नव्हते.