Renee Nicole Good Death: अमेरिकेच्या मिनेपोलिस शहरात बुधवारी एका संघराज्य एजंटने केलेल्या गोळीबारात ३७ वर्षीय रेनी निकोल गुड या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही महिला कोणत्याही गुन्ह्यात सामील नव्हती किंवा ती एजंट्सचे लक्ष्यही नव्हती, तरीही तिच्यावर भररस्त्यात गोळ्या झाडण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कारवाईची मागणी केली जात आहे.
मिनेपोलिसमधील ३४ स्ट्रीटवर आयसीई एजंट्सची एक मोठी कारवाई सुरू होती. यावेळी तिथे उभ्या असलेल्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. रेनी गुड यांची कार या गर्दीत अडकली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, एजंट्सनी रेनी यांच्या कारला घेराव घातला होता. कार पुढे घेण्याचा प्रयत्न करत असतानाच, एका एजंटने त्यांच्या ड्रायव्हर सीटच्या खिडकीतून थेट तीन गोळ्या झाडल्या. या गोळ्या रेनी यांच्या चेहऱ्याला लागल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
"ती घाबरली असेल"; आईचा आक्रोश
रेनी यांच्या आईने, डोना गेंजर यांनी रडत सांगितले की, त्यांची मुलगी अत्यंत दयाळू आणि निस्वार्थी होती. "माझी मुलगी कोणालाही इजा करू शकत नाही, ती कदाचित त्या एजंट्सना पाहून प्रचंड घाबरली असेल," असे त्यांनी सांगितले. ज्यावेळी गोळीबार झाला, तेव्हा रेनी यांचा जोडीदार त्यांच्यासोबत होता, तर त्यांचा ६ वर्षांचा मुलगा शाळेत होता.
या घटनेनंतर अमेरिकेचे राजकारण तापले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल पोस्टमध्ये संबंधित एजंटचा बचाव केला आहे. त्यांनी या घटनेला स्वसंरक्षण म्हटले असून, रेनी यांनी अधिकार्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी याला वामपंथीयांचे कारस्थान असल्याचे म्हटले आहे. होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांनी या घटनेला देशांतर्गत दहशतवाद असे संबोधल्याने नागरिकांमध्ये अधिक संताप निर्माण झाला आहे.
मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्झ यांनी ट्रम्प आणि नोएम यांना खडे बोल सुनावले आहेत. "आम्हाला फेडरल सरकारकडून कोणत्याही मदतीची गरज नाही, तुम्ही आधीच खूप नुकसान केले आहे," असे ते म्हणाले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांनी नॅशनल गार्डला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मिनेपोलिसचे पोलीस प्रमुख ब्रायन ओहारा यांनी स्पष्ट केले की, मृत रेनी गुड या कोणत्याही तपासाचा भाग नव्हत्या. आता ब्युरो ऑफ क्रिमिनल ॲप्रिहेंशन या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
Web Summary : Renee Nicole Good died in Minneapolis after an ICE agent shot her. The shooting sparked outrage. Trump defended the agent, calling it self-defense. Investigations are underway.
Web Summary : मिनियापोलिस में रेनी निकोल गुड की एक ICE एजेंट द्वारा गोली मारकर हत्या कर दी गई। गोलीबारी से आक्रोश फैल गया। ट्रंप ने इसे आत्मरक्षा बताते हुए एजेंट का बचाव किया। जांच जारी है।