जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून भारताने पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर भविष्यात पुन्हा अशा प्रकारचे हल्ले झाले, तर भारत गप्प बसणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे. ते सध्या चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून बुधवारी (२ जुलै २०२५) क्वाड परिषदेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात जागतिक व्यासपीठावरून पाकिस्तानला फटकारले.
महत्वाचे म्हणजे, भारत आणि अमेरिका यांच्यात परराष्ट्र नीतीवर महत्वाची चर्चा होत असतानाच, जयशंकर यांनी हे विधान केले आहे.
जगाने भारताची एकी बघितली -वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत क्वाड (QUAD) बैठकीनंतर, पत्रकारांसोबत बोलताना जयशंकर म्हणाले, यावेळी सर्व पक्षांच्या खासदारांनी भारताच्या जागतिक सहभागात एकजुटीने भाग घेतला.
...तेव्हा जगाला मजबूत राष्ट्रीय एकतेचा संदेश जातो -याला भारताची राजकीय विविधता, असे संबोधत जयशंकर म्हणाले, जेव्हा वेगवेगळ्या विचारसरणीचे नेते परदेशात एका स्वरात भारताची बाजू मांडतात, तेव्हा जगाला मजबूत राष्ट्रीय एकतेचा संदेश जातो. शशी थरूर, सुप्रिया सुळे, कनिमोई, रविशंकर प्रसाद, जय पांडा, संजय झा, सलमान खुर्शीद, अनिल शर्मा आणि गुलाम नबी आझाद यांसारख्या नेत्यांचा उल्लेख करत ते म्हणाले, हे सर्वजण एकत्रितपणे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मजबूत करतात.