टॅरिफ वॉरदरम्यान PM मोदी आणि जिनपिंग यांची भेट; चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले,'एकत्र येणे महत्त्वाचे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 11:54 IST2025-08-31T11:02:08+5:302025-08-31T11:54:29+5:30

चीन दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली.

PM Narendra Modi meets Chinese President Xi Jinping at SCO summit | टॅरिफ वॉरदरम्यान PM मोदी आणि जिनपिंग यांची भेट; चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले,'एकत्र येणे महत्त्वाचे'

टॅरिफ वॉरदरम्यान PM मोदी आणि जिनपिंग यांची भेट; चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले,'एकत्र येणे महत्त्वाचे'

PM Modi Meet Xi Jinping: शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीचीनमध्ये आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. तियानजिनमध्ये होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  शी जिनपिंग यांच्यात बैठक झाली. पंतप्रधान ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत उत्तर चीनमधील तियानजिन येथे होणाऱ्या एससीओ परिषदेत सहभागी झाले आहेत. याआधी दहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदी आणि  शी जिनपिंग यांची भेट झाली होती.

दोन्ही नेत्यांची बैठक भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता सुरू झाली. टॅरिफमुळे भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये काही प्रमाणात सुधारणा झालेली असताना पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्यात ही भेट होत आहे. सात वर्षांनंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला चीन दौरा आहे. तसेच दहा महिन्यांत राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी त्यांची दुसरी भेट आहे. यापूर्वी रशियाच्या काझान शहरात झालेल्या ब्रिक्स २०२४ शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली होती.

पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट झाल्यानंतर सुमारे ४० मिनिटे झाल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही नेत्यांनी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली हे स्पष्ट झालं नाही. मात्र बैठकीनंतर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दोन्ही देशांनी एकत्र येणे महत्त्वाचे असल्याचे म्हटलं.

"पंतप्रधान मोदी, तुम्हाला पुन्हा भेटून खूप आनंद झाला. एससीओ शिखर परिषदेसाठी मी तुमचे चीनमध्ये स्वागत करतो. गेल्या वर्षी कझानमध्ये आमची बैठक यशस्वी झाली. जग बदलाकडे वाटचाल करत आहे. चीन आणि भारत हे दोन सर्वात जुन्या संस्कृती आहेत. आपण जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहोत आणि ग्लोबल साउथचा भाग आहोत. त्यामुळे आपल्यासाठी मित्र असणे, चांगले शेजारी असणे आणि  एकत्र येणे खूप महत्वाचे आहे," अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर शी जिनपिंग यांनी दिली.

अमेरिकेतील टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची ही भेट खूप महत्त्वाची मानली जात आहे. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यात या भेटीची महत्त्वाची भूमिका आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनसह अनेक देशांवर अतिरिक्त कर लादल्यानंतर एससीओ शिखर परिषदेचे महत्त्व वाढले आहे. ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादला आहे आणि चीनवर २०० टक्के कर लादण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे एससीओ शिखर परिषदेत एक संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना १५ जून २००१ रोजी झाली. त्यानंतर जुलै २००५ मध्ये अस्ताना शिखर परिषदेत भारताला निरीक्षक दर्जा देण्यात आला. २०१७ मध्ये भारत या संघटनेचा सदस्य झाला. सध्या एससीओमध्ये १० सदस्य देश आहेत. दोन निरीक्षक देश आणि १४ संवाद भागीदार आहेत. जगातील सुमारे ४० टक्के लोकसंख्या एससीओमध्ये समाविष्ट असलेल्या देशांमध्ये राहते. एससीओ देशांचा जगाच्या जीडीपीमध्ये २० टक्के वाटा आहे. याशिवाय, जगातील २० टक्के तेल साठे या देशांमध्ये आहेत.
 

Web Title: PM Narendra Modi meets Chinese President Xi Jinping at SCO summit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.