pm narendra modi conferred with order of zayed uae highest civilian award | पंतप्रधान नरेंद्र मोदींना यूएईचा सर्वोच्च सन्मान; ‘ऑर्डर ऑफ झायद’ने गौरवान्वित 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना यूएईचा सर्वोच्च सन्मान; ‘ऑर्डर ऑफ झायद’ने गौरवान्वित 

अबूधाबी- पंतप्रधान नरेंद्र मोदींना संयुक्त अरब अमिराती(United Arab Emirates) या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. मोदींना यूएईचा सर्वोच्च सन्मान ‘ऑर्डर ऑफ झायद’ मिळाला आहे. पंतप्रधान मोदींनी यूएईबरोबर द्विपक्षीय संबंध वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यूएईचा ‘ऑर्डर ऑफ झायद’ (Order Of Zayed) या पुरस्काराने मोदींचा गौरव झाला असून, या पुरस्काराने सन्मानित होणारे मोदी पहिले भारतीय ठरले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यूएईच्या बाजारात रुपे (RuPay) कार्ड सादर केलं असून, दुकानदार आणि व्यावसायिकांना भारताशी जोडण्यासाठी याचा फायदा होणार आहे. संयुक्त अरब अमिरात पश्चिम आशियातला असा पहिला देश म्हणून समोर आला आहे, ज्यानं भारताची इलेक्ट्रॉनिक प्रणाली स्वीकारली आहे. भारतानं यापूर्वी सिंगापूर आणि भूतानमध्ये रुपे कार्ड चालवण्यास सुरुवात केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी यूएईमध्ये सांगितलं की, भारतानं आपल्या राजकीय स्थिरता आणि विश्वासार्हतेच्या जोरावर आज देशभरातल्या गुंतवणूकदारांना आकर्षित केलं आहे.

या पुरस्काराबाबत मोदी म्हणाले की, “हा पुरस्कार फक्त माझा नाही, तर 1.3 अब्ज भारतीयांचा आहे. यूएई आणि भारताच्या घनिष्ठ मैत्रीचा हा पुरावा आहे. दोन्ही देशातील सुरक्षा, शांतता आणि समृद्धीसाठी हे संबंध आवश्यक आहेत. भारत आणि यूएईच्या मैत्रीत कोणत्याही सीमेचं बंधन नाही” दरम्यान, मोदी आज अबूधाबीत प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. पंतप्रधान मोदी हे प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्यासह महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त पोस्ट तिकीट जारी करणार आहेत.पंतप्रधान मोदींचा हा तिसरा यूएई दौरा आहे. त्यांचा हा दौरा अत्यंत खास मानला जात आहे. यूएईत पोहोचल्यानंतर मोदींनी खलीज टाईम्सला मुलाखत दिली. मोदींनी गेल्या चार वर्षातील भारत आणि यूएई यांच्यातील संबंधांवर भाष्य केलं.
ऑर्डर ऑफ झायद हा यूएईचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी बजावणाऱ्या राष्ट्राच्या प्रमुखांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राष्ट्रपती आणि विविध देशांच्या प्रमुखांना सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची 1995मध्ये सुरुवात झाली, यापूर्वी 2007मध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, 2010मध्ये ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ, 2016मध्ये सौदीचे शाह सलमान बिन अब्दुल्ला अजीज अल सौद आणि 2018मध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.  

Web Title: pm narendra modi conferred with order of zayed uae highest civilian award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.