India Ban China Media Global Times: पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध सतत कठोर पावले उचलत आहे. ७ मे च्या रात्री भारताने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ले करून लाँच पॅड उद्ध्वस्त केले.त्यापूर्वी, भारत सरकारने भारतातील अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घातली होती. नंतर त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्म आणि मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरही बंदी घातली. असे असूनही पाकिस्तानकडून हल्ले सुरूच होते आणि चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता भारताने पाकिस्ताननंतर चीनविरोधातही डिजिटल स्ट्राईक केला आहे.
पाकिस्ताननंतर आता भारताने चीनविरुद्ध कारवाई केली आहे. त्यांचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या 'ग्लोबल टाईम्स'ला भारताने ब्लॉक केले आहे. सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील त्यांचे अकाउंट ब्लॉक केले आहे. ग्लोबल टाईम्स भारताविरुद्ध चुकीच्या व खोट्या बातम्या चालवत होते असा दावा करून त्यांच्यावर ही बंदीची कारवाई करण्यात आली आहे. ग्लोबल टाईम्स हे चीनचे राष्ट्राध्यश्र शी जिनपिंग यांचा अजेंडा रेटण्याचे काम करते. ते भारताविरुद्ध खोट्या बातम्या पसरवते. तसेच, चीनची वृत्तसंस्था झिनुआ न्यूजचे X अकाउंटही केलं ब्लॉक करण्यात आले आहे. या कारवाया करण्यापूर्वी भारताने अरुणाचल प्रदेशवर चीनबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली होती.
अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नांना त्यांनी स्पष्टपणे नकार दिला होता. भारताने म्हटले की, अशा हास्यास्पद प्रयत्नांमुळे काहीही फरक पडणार नाही. अरूणाचल प्रदेश हे राज्य भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील हे निर्विवाद सत्य बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा दक्षिण भाग असल्याचा चीनचा दावा आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यावर म्हणाले की, चीनने भारतातील अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याचे व्यर्थ आणि हास्यास्पद प्रयत्न केल्याचे आपण पाहिले आहे. आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार आम्ही अशा प्रयत्नांना स्पष्टपणे नकार देतो.