चेह-यावरील प्लॅस्टिक सर्जरी पडली महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 16:05 IST2017-10-15T16:05:23+5:302017-10-15T16:05:49+5:30
तीन चिनी महिला मोठ्याच संकटात सापडल्या आहेत. या तिघी आपल्या चेह-यावर प्लॅस्टिक सर्जरी करण्यासाठी परदेशात गेल्या होत्या.

चेह-यावरील प्लॅस्टिक सर्जरी पडली महागात
नवी दिल्ली - तीन चिनी महिला मोठ्याच संकटात सापडल्या आहेत. या तिघी आपल्या चेह-यावर प्लॅस्टिक सर्जरी करण्यासाठी परदेशात गेल्या होत्या. त्यांना मायदेशी मात्र जाता आले नाही, कारण त्यांना प्रवास करायला मनाई करण्यात आली असून विमानतळावर थांबवून धरण्यात आले आहे.
चीनच्या सुट्यांमध्ये या तिघी दक्षिण कोरियात चेह-यावर प्लॅस्टिक सर्जरी करून घ्यायला गेल्या. परतताना मात्र त्या विमानतळावर अधिका-यांना आपली मूळ ओळख पटवू शकल्या नाहीत कारण त्यांच्या पासपोर्टवर त्यांचे जे छायाचित्र आहे त्याच्यासारख्या त्या आता दिसत नसल्याचे अधिका-यांना जाणवले.
शस्त्रक्रियेमुळे त्यांचे चेहरे खूपच सूजले होते व त्यावर बँडेज होते. विमानतळावर या तिघी पासपोर्ट हातात घेऊन चेह-याला पट्ट्या बांधलेल्या अवस्थेत बसलेली छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहेत. कोरियन अधिका-यांनी या महिलांना थांबवून धरून त्यांची चौकशी सुरू केली आहे. त्यांना मायदेशी जाऊ दिले आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही.