फिफा वर्ल्डकपूर्वी मोरोक्कोत दिला जाणार ३० लाख श्वानांचा बळी; कारण वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:47 IST2025-01-18T09:47:37+5:302025-01-18T09:47:56+5:30

माध्यमांच्या वृत्तानुसार, मोरोक्कोने देशात अनेक ठिकाणी लाखो श्वानांच्या हत्येची योजना आखल्याचे समोर आलं आहे.

Plan to kill 3 million dogs in Morocco for FIFA World Cup 2030 | फिफा वर्ल्डकपूर्वी मोरोक्कोत दिला जाणार ३० लाख श्वानांचा बळी; कारण वाचून बसेल धक्का

(प्रातिनिधीक छायाचित्र)

FIFA World Cup: फिफा विश्वचषक २०३० हा मोरोक्को, स्पेन आणि पोर्तुगाल यांनी संयुक्तपणे आयोजित केला आहे. या मेगा इव्हेंटसाठी मोरोक्कोने आधीच तयारी सुरू केली आहे. फुटबॉलची ही स्पर्धा सर्वात मोठी  जगभरातून लाखो फुटबॉल चाहत्यांना आकर्षित करत असते. त्यामुळे मोरोक्को देशाला स्वच्छ आणि आकर्षक बनवण्यासाठी असे क्रूर पाऊल उचलणार आहे. त्यामुळे मोरोक्कोवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, मोरोक्को २०३० फिफा विश्वचषकापूर्वी किमान ३ दशलक्ष रस्त्यावरील कुत्र्यांना मारण्याची योजना आखत आहे.

मोरोक्कोमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकादरम्यान शहर स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरील कुत्र्यांबाबत मोठे पाऊल उचलले जाणार आहे, त्याला आतापासूनच विरोध होऊ लागला आहे. फिफा विश्वचषकादरम्यान देश-विदेशातील लाखो चाहते सामने पाहण्यासाठी शहरात येणार आहेत. त्यामुळे भटक्या जनावरांचा त्रास होऊ नये म्हणून सुमारे ३० लाख कुत्र्यांना मारण्याची तयारी शहर प्रशासनाने केली आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

पुढच्या फुटबॉल विश्वचषकाच्या निमित्ताने मोरोक्कन शहरे फुटबॉल चाहत्यांसाठी अधिक आकर्षक बनवण्यासाठी भटक्या कुत्र्यांकडे साफसफाईची कसरत म्हणून पाहिले जात आहे. तीन लाख श्वान मारण्याच्या या पावलावर प्राणी हक्क गटांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही वृत्तानुसार असा दावाही करण्यात आला आहे की मोरोक्कोने देशात अनेक ठिकाणी हजारो श्वानांना मारले आहेत आणि विश्वचषक जवळ येताच ही संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

इंटरनॅशनल ॲनिमल कोलिशनने या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. स्ट्रायक्नाईन नावाचे घातक रसायन श्वानांना दिले जात आहे, जे सामान्यतः कीटकनाशक म्हणून वापरले जाते. इतर वृत्तांनुसार, कुत्र्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या जात आहेत किंवा पकडून त्यांना कत्तलखान्यात पाठवले जात आहे. काही प्रकरणांमध्ये, गोळीबारातून वाचलेल्या कुत्र्यांना स्थानिक अधिकाऱ्यांकडून हत्याराने मारले जात आहे.

प्राणी हक्क कार्यकर्ते जेन गुडॉल यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशनकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे. मोरोक्कोच्या क्रूर कृतीकडे डोळेझाक केल्याचा आरोप करत या प्रकरणावर त्वरित कारवाई करण्याची मागणी जेन गुडॉल यांनी केली आहे. फिफाने २०२३ मध्ये मोरोक्कोला आयोजनाचे अधिकार दिले जातील अशी घोषणा केल्यानंतर श्वानांच्या हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. प्राणी हक्क कार्यकर्ते फिफाशी संपर्क साधत आहेत आणि मोरोक्कोवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. मात्र, मोरोक्को किंवा फिफाने या वादाबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.

दरम्यान, मोरोक्कोतल्या वर्ल्डकप सामन्यादरम्यान देशांमध्ये करोडो पर्यटक येणार आहेत. त्यामुळे मोरोक्कोने फिफाच्या मानकांची पूर्तता करण्यासाठी स्टेडियम आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, अंतिम सामन्याचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. २०३०चा फिफा वर्ल्डकप  विशेष असणार आहे कारण या स्पर्धेचा १०० वा वर्धापन दिन आहे.

Web Title: Plan to kill 3 million dogs in Morocco for FIFA World Cup 2030

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.