Plague: 600 वर्षांपूर्वी 'या' देशातून प्लेगचा आजार पसरला, शास्त्रज्ञांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 15:29 IST2022-06-16T15:28:57+5:302022-06-16T15:29:03+5:30
Plague origion: प्लेगच्या साथीमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत प्लेगच्या प्रसाराबाबत अनेक दावे करण्यात आले होते, परंतु आता शास्त्रज्ञांनी या आजाराबाबत नवीन माहिती समोर आणली आहे.

Plague: 600 वर्षांपूर्वी 'या' देशातून प्लेगचा आजार पसरला, शास्त्रज्ञांनी केला खुलासा
Plague origion: मानवी संस्कृतीच्या इतिहासात वेगवेगळ्या कालखंडात उद्भवलेल्या साथीच्या रोगांचा मानवी जीवनावर वाईट परिणाम झाला आहे. कोरोनापूर्वी, स्पॅनिश फ्लू आणि प्लेगसारख्या जागतिक महामारीने लाखो लोकांचा बळी घेतला होता. यातच आता शास्त्रज्ञांनी प्लेगच्या साथीबद्दल महत्त्वाची माहिती समोर आणली आहे.
प्लेगची महामारी कधी आणि कुठे पसरली?
मध्यपूर्वेतील एका प्रसिद्ध रेशीम व्यापार मार्गाजवळ सापडलेल्या स्मशानभूमीत शेकडो वर्षांपूर्वी सापडलेल्या सांगाड्यांचे परीक्षण करून, शास्त्रज्ञांनी 14 व्या शतकात ब्लॅक डेथची महामारी कशी सुरू झाली, हे शोधून काढले आहे. खरेतर, उत्खननादरम्यान सापडलेल्या सांगाड्यांच्या डीएनए तपासणीतून 600 वर्षांहून अधिक जुने रहस्य उघड झाले आहे. याची जगाला आजपर्यंत माहिती नव्हती. 14 व्या शतकात प्लेगच्या साथीने जगात प्रचंड विनाश घडवून आणला होता, त्यामुळे त्या काळातही करोडो लोकांचा मृत्यू झाला होता.
जगातील पहिला प्लेग रुग्ण कधी सापडला?
रॉयटर्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, स्कॉटलंडमधील स्टर्लिंग विद्यापीठ, जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट आणि ट्युबिंगेन विद्यापीठाच्या संशोधन पथकाने किर्गिझस्तानमधील स्मशानभूमीतून सापडलेल्या डीएनएचे विश्लेषण केले आणि असे आढळले की मध्य आशियामध्ये प्लेगची साथ सुरू झाली. शेकडो वर्षांपूर्वी येथे पुरलेल्या लोकांच्या दातांमध्ये प्लेग निर्माण करणाऱ्या जीवाणूंचा डीएनए संशोधकांना सापडला आहे. संशोधकांनी असेही सांगितले की, एका दशकापेक्षा कमी कालावधीत ही महामारी जगभर पसरली आहे.
प्लेगचा प्रसार उंदरांनी नव्हे तर मानवाने केला
या संशोधनाचा अहवाल जर्नल नेचरमध्ये प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासाचे सह-लेखक आणि स्टर्लिंग युनिव्हर्सिटीचे इतिहासकार फिलिप स्लाव्हिन म्हणतात की, आमच्या शोधानंतर प्लेग महामारीबद्दल शतकानुशतके जुने वादविवाद आणि सिद्धांत अप्रासंगिक बनले आहेत. या संशोधनात असेही सांगण्यात आले होते की, ही महामारी उंदरांच्या माध्यमातून नव्हे तर मानवातून जगभरात पसरली होती.
त्याचा उद्रेक अनेक शतके टिकला
अभ्यास पथकाच्या मते, ही महामारी शेकडो वर्षांपासून लोकांचा बळी घेत आहे. परिस्थिती अशी होती की प्लेगचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच त्याची भीती पसरली होती. एका अहवालानुसार, शेकडो वर्षांपूर्वी लंडनमध्ये प्लेगचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी मृतदेह पुरण्यासाठी मोठी जागा सोडण्यात आली होती. अहवालात असेही म्हटले आहे की, प्लेग ज्या शहरात पसरला, तेथील 50-60 टक्के लोकसंख्या नष्ट झाली. या महामारीमुळे सर्वाधिक मृत्यू युरोप आणि मध्य पूर्वमध्ये झाले आहेत. इराण आणि मध्य आशियातील लाखो लोकांना अकाली मृत्यूला सामोरे जावे लागले.