पाकिस्तानचे तुकडे होऊन बनणार 'सिंधुदेश'?; लोक रस्त्यावर उतरले, संघर्ष पेटला, ४५ जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 07:38 IST2025-12-10T07:37:51+5:302025-12-10T07:38:49+5:30
वेगळ्या सिंधुदेशाची मागणी करत कराचीमध्ये लोकांनी रॅली काढली आहे. त्यावेळी पोलिसांसोबत लोकांची झटापट झाली.

पाकिस्तानचे तुकडे होऊन बनणार 'सिंधुदेश'?; लोक रस्त्यावर उतरले, संघर्ष पेटला, ४५ जण अटकेत
इस्लामाबाद - असीम मुनीर यांना मिळालेल्या बढतीनंतर पाकिस्तानात गदारोळ माजला आहे. न्यायाधीशांसह वकिलांचं राजीनामा सत्र सुरू झालं आहे. शहबाज शरीफ सरकारने संविधानाची हत्या केली असा आरोप होत आहे. अमेरिकेसारख्या देशात मुनीर यांच्यावर बंदी आणण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे इरफान खान यांच्याबाबत विविध चर्चांमुळे पाकिस्तानची जगभरात नाचक्की होत आहे. त्यातच पाकिस्तानात लोकचळवळ उभी राहिली आहे. हे लोक सिंधु देशाची मागणी करत आहेत. अलीकडेच कराचीत सिंधु संस्कृती दिनी असं काही झालं ज्यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत.
सिंधुदेशाची मागणी, लोकांनी काढली रॅली
वेगळ्या सिंधुदेशाची मागणी करत कराचीमध्ये लोकांनी रॅली काढली आहे. त्यावेळी पोलिसांसोबत लोकांची झटापट झाली. स्वतंत्र सिंधुदेश मागणीसाठी संतप्त लोकांनी काही प्रमाणात दगडफेकही सुरू केली. त्यानंतर जवळपास ४५ आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. मागील महिन्यात भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानातील सिंध प्रांत एक दिवस भारतात समाविष्ट होऊ शकतो असं विधान केले होते. सिंह यांच्या विधानावरून पाकिस्तानला चांगलीच मिरची झोंबली. परंतु गेल्या कित्येक वर्षापासून पाकिस्तानात सिंधु देशाची मागणी लोकांकडून केली जात आहे.
दरवर्षी कार्यक्रमाचं आयोजन
सिंधुदेशाची मागणी करत सिंधी लोक स्वतंत्र देशाची मागणी करतात. सिंधु संस्कृती दिवसाचं औचित्य साधत दरवर्षी इथं कार्यक्रम घेतले जातात. त्यातून स्वतंत्र सिंधुदेशाची मागणी जोर धरू लागते. २००९ पासून दरवर्षी डिंसेबरच्या पहिल्या रविवारी सिंधु संस्कृती दिवस सोहळा पार पाडला जातो. यावेळच्या कार्यक्रमात वेगळ्या सिंधुदेशासाठी जिये सिंध मुत्तहिदा महाज(जेएसएसएम) यांच्या बॅनरखाली सगळे लोक एकवटले होते.
रॅलीत हिंसा कशी भडकली?
दरम्यान, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या रॅलीचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला होता. ज्यानंतर शांततेत सुरू असणाऱ्या रॅलीत हिंसा भडकली. कराची पोलिसांनी झटापट आणि संघर्ष करणाऱ्या ४५ आंदोलनकर्त्यांना अटक केली. त्यानंतर लोक संतापले. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर केला. पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत ५ पोलीस जखमी झाले.