४३ कोटी रुपये द्या, अमेरिकन व्हा! अवैध प्रवाशांना बाहेर काढत असतानाच ट्रम्प यांनी आणली स्कीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 08:07 IST2025-02-27T08:07:47+5:302025-02-27T08:07:59+5:30
श्रीमंत व यशस्वी लोक अमेरिकेचा व्हिसा घेऊ शकतात, असा दावा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला आहे.

४३ कोटी रुपये द्या, अमेरिकन व्हा! अवैध प्रवाशांना बाहेर काढत असतानाच ट्रम्प यांनी आणली स्कीम
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सरकारने जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ३५ वर्षांपूर्वीच्या व्हिसाऐवजी ५० लाख डॉलरमध्ये (४३ कोटी रुपये) 'गोल्ड कार्ड' सादर करण्याची योजना आखली आहे. श्रीमंत व यशस्वी लोक अमेरिकेचा व्हिसा घेऊ शकतात, असा दावा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला आहे. यामुळे जगभरातील श्रीमंत अमेरिकेकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र एच१-बी व्हिसाचा पर्याय म्हणून ईबी-५ व्हिसाकडे पाहणाऱ्या भारतीयांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (वृत्तसंस्था)
कोण देते गोल्डन व्हिसा?
अमेरिका, ब्रिटन, स्पेन, ग्रीस, माल्टा, ऑस्ट्रेलिया, कॅनडा व इटलीसह जगभरातील शंभरहून अधिक देश श्रीमंत लोकांना 'गोल्डन व्हिसा' देत असल्याचे या संस्थेने नमूद केले.
अमेरिकेत अवैध स्थलांतरितांची नोंदणी
ट्रम्प प्रशासनाने अवैधरीत्या राहणाऱ्या स्थलांतरितांच्या नोंदणीला सुरुवात केली आहे.
अवैध स्थलांतरितांनी याबद्दल स्वतः माहिती दिली नाही, तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते किंवा त्यांना आर्थिक दंड भरावा लागू शकतो.
अमेरिकेत बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नोंदणी करणे, बोटांचे ठसे देणे व ते कुठे राहतात, याविषयची माहिती देणे आवश्यक असल्याचे गृह सुरक्षा विभागाने म्हटले आहे.
ट्रम्प यांचा काय दावा?
जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात • पैशाची गुंतवणूक करतील. जास्तीत जास्त कर भरतील. त्यांच्या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे 'गोल्ड कार्ड' ही योजना अत्यंत यशस्वी होईल, असा दावा ट्रम्प यांनी केला.
ट्रम्प सरकारने तत्काळ ही योजना सुरू करण्याचे • ठरवले आहे. त्यामुळे दोन आठवड्यांत ईबी-५ व्हिसाची जागा 'ट्रम्प गोल्ड कार्ड' घेईल, अशी माहिती वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी दिली. अमेरिकन संसदेने १९९० मध्ये विदेशी गुंतवणूकदारांसाठी ईबी-५ व्हिसा सादर केला होता. अमेरिकेत दहा लाख डॉलरची गुंतवणूक करणाऱ्यांना तो दिला जात होता.
ग्रीन कार्डसारखेच 'गोल्ड कार्ड'
ग्रीन कार्डप्रमाणेचे गोल्ड कार्ड असेल. मात्र, या कार्डमुळे कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही.
श्रीमंत लोकांना नागरिकत्व मिळवण्यासाठीचा गोल्ड कार्ड हा एक मार्ग असेल. गोल्ड कार्ड मिळवण्यासाठी संसदेच्या मंजुरीची आवश्यकता भासणार नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.