समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 08:07 IST2025-07-26T08:07:25+5:302025-07-26T08:07:37+5:30
जगात अनेक देशांमध्ये दाम्पत्याला मूल झाल्यावर आईला मातृत्व रजा दिली जाते. काही देशांमध्ये पालकांनाही पितृत्व रजा दिली जाते; पण हे पालक जर समलैंगिक असतील तर?

समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
जगात अनेक देशांमध्ये दाम्पत्याला मूल झाल्यावर आईला मातृत्व रजा दिली जाते. काही देशांमध्ये पालकांनाही पितृत्व रजा दिली जाते; पण हे पालक जर समलैंगिक असतील तर? म्हणजे बाळाचे ‘आई-वडील’ दोन्ही पुरुष किंवा दोन्ही स्त्री असतील तर?
इटलीमध्ये याच प्रश्नावरून सध्या रान उठलं आहे. इटलीमध्ये मुळात समलैंगिक विवाहांना मान्यता नाही; पण तेथील २०१६च्या ‘सिव्हिल युनियन लॉ’नुसार समलिंगी जोडप्यांना सर्वसामान्य जोडप्यांप्रमाणेच अनेक अधिकार देण्यात आले आहेत. या संदर्भात इटलीच्या न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निकालामुळे इटलीमध्ये आणि जगभरात चर्चेला तोंड फुटलं आहे.
इटलीमध्ये जोडप्याला मूल झाल्यानंतर त्याच्या जैविक वडिलांनाही १० दिवसांची पितृत्व रजा मिळते. इटलीच्या न्यायालयाने मात्र नुकताच एक क्रांतिकारी निर्णय देताना म्हटलं आहे, समलैंगिक आईच्या जोडीदारालाही पितृत्व रजा मिळण्याचा हक्क आहे, बाळाच्या संगोपनाचा पालकांच्या लैंगिक प्रवृत्तीशी काहीही संबंध नाही. बाळाला दोन्ही पालकांचं प्रेम मिळण्याचा अधिकार आहे, मग ते समलैंगिक असोत किंवा भिन्नलैंगिक! कोणत्याही परिस्थितीत बाळाचं हित सर्वोच्च महत्त्वाचं आहे.
न्यायालयाच्या याच निर्णयानं इटलीमध्ये गदारोळ माजला आहे. काहींचं म्हणणं आहे, न्यायालयाचा निर्णय अतिशय योग्य, पुरोगामी आणि मानवतेचा विचार करणारा आहे, तर काही जणांचं म्हणणं आहे, न्यायालयानं असा निर्णय देऊन ‘अनौरस मुलांना जन्म देण्याचा आणि त्यांचा बाजार भरवण्याचा परवानाच काहीजणांना दिला आहे.’
दुसरीकडे, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी मात्र गेल्या काही काळापासून पारंपरिक कुटुंब पद्धतीलाच प्रोत्साहन देत आहेत. अशा प्रकाराला त्यांचा विरोध आहे. सरोगसीच्या संदर्भातील कायदेही त्यांनी अतिशय कडक केले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सरकारी रुग्णालयांत आणि सरकारी कार्यालयांत जन्म प्रमाणपत्रांवर केवळ जैविक आईचीच नोंद केली जात आहे. त्यांच्या जोडीदाराची कोणतीही नोंद प्रमाणपत्रांवर केली जात नाही. मुलावर कायदेशीर अधिकार प्राप्त करण्यासाठी अजैविक आईला त्या मुलाला दत्तक घ्यावं लागतं; पण जिथे दोन्ही पालकच समलैंगिक आहेत, त्या संदर्भात जणू छुपी बंदीच आहे.
जॉर्जिया मेलोनी सरकारनं आयव्हीएफ आणि सरोगसीच्या माध्यमातून मूल जन्माला घालण्यावर अतिशय कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अनेक इटालियन नागरिक बाळासाठी परदेशात जाऊन सरोगसीच्या माध्यमातून मूल जन्माला घालतात. इटालियन सरकारनं या गोष्टीलाही अटकाव करताना त्यांना ‘अपराधी’ घोषित केलं आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयानं दिलेला निर्णय इटली सरकारच्या धोरणांवरही कोरडे ओढणारा मानला जात आहे.
‘प्रो लाइफ अँड फॅमिली असोसिएशन’नं मात्र या निर्णयाचा निषेध करताना म्हटलं आहे की, समलिंगी जोडप्यांपासून जन्माला आलेली हजारो मुलं म्हणजे ‘विनोद’ आहे. त्याचवेळी एलजीबीटीक्यू समुदायाच्या संघटनेचं म्हणणं आहे, गेल्या कित्येक वर्षांपासून जी मागणी आम्ही करीत होतो, तिला अखेर मान्यता मिळाली आहे. मुला-मुलींना जन्मापासूनच आपल्या पालकांना ‘मान्यता मिळण्याचा’ अधिकार आहे, जरी त्यांचे पालक दोन्ही ‘माताच’ असल्या तरी!